घरगुती हिंसाचारावर आधारित ‘स्वमान से’ लघुपटाची विविधस्तरावर दखल
पुणे, दि. १९ – कोरोनाच्या काळात, टाळेबंदीमध्ये कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील शारीरिक हिंसाचार याच्या अनेक घटना समोर आल्या. याविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ (फ्लो), पुणे चॅप्टरने निर्माण केलेल्या ‘स्वमान से’ अर्थात सन्मानाने या लघुपटाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर दखल घेतली जात आहे.
या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन दीप्ती घाटगे यांचे असून चॅप्टरच्या माजी अध्यक्षा डॉ. अनिता सणस व नीरु गोयल या निर्मात्या आहेत. फिक्की फ्लो पुणे चॅप्टरची निर्मिती असलेल्या या लघुपटाची फिक्की फ्लोच्या राष्ट्रीयस्तरावर नोंद घेत फिक्की फ्लो राष्ट्रीय अध्यक्षा जानबी फुकन, माजी अध्यक्ष परिषद व नियामक मंडळाचे सदस्य यांनी ‘स्वमान से’ या लघुपटाला उत्तम कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केल्याचे फ्लो पुणे चॅप्टरच्या माजी अध्यक्ष अनिता सणस यांनी सांगितले. याशिवाय रोम येथील गोल्डन लघुपट महोत्सव व टोकिओ आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव येथे लघुपटाची निवड झाली असल्याची माहिती घाटगे यांनी दिली.
याविषयी घाटगे म्हणाल्या, “स्त्रिया आपल्या घराच्या, कुटुंबियांच्या हितासाठी दिवस-रात्र झटतात. पण राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालातील आकडेवारीनुसार आपल्या लक्षात येईल की प्रत्येक तीन स्त्रियांमागे एका महिलेवर कौटुंबिक हिंसाचार होताना दिसतो. मी स्वतः एक स्त्री म्हणून मला ही बाब अस्वस्थ करते. यामुळेच मी कौटुंबिक हिसाचारावर प्रकाशझोत टाकणारे कथालेखन केले व हा लघुपट बनवला गेला. यात मी दागिन्यांचा वापर महिलेच्या शृंगारासाठी न करता तिच्या शरीरावरील जखमा, व्रण लपविण्यासाठी केला आहे. यातील मुख्य पात्र आशा ही अन्य सामान्य स्त्रियांप्रमाणे आपले दुःख लपवत असते. पण एकदा धाडस करून ती बोलते. तिचे हे व्यक्त होणेच मला फार महत्वपूर्ण वाटते. यात कोठेही भडकपणा न आणता अत्यंत हळुवारपणे, साध्या पद्धतीने ही कथा मांडली आहे.”
“कौटुंबिक अत्याचार ही गोष्ट त्या स्त्रीसाठीही कलंक असतो. या सामाजिक लाजेतूनच ती गप्प राहते. परंतु या लघुपटाद्वारे एखाद्याही पीडित महिलेने आपल्या परिस्थितीवर विचार करायला सुरुवात जरी केली तरी हे आमचे यश आहे, आमचा उद्देश सफल होत आहे असे आम्हाला वाटेल.” असेही त्या म्हणाल्या.
