Saturday, May 30, 2026
NATIONAL

राजधानी दिल्लीतही विकेन्ड लॉकडाऊन

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतही विकेन्ड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतल्यानंतर या संदर्भात घोषणा केली. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सोडून इतर गोष्टींवर बंदी राहणार आहे. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी सर्वांना मास्कचा वापर करण्याचे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

विकेन्ड लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद?

दिल्लीत शनिवारी आणि रविवारी संपूर्ण दिवसभर कर्फ्यू लागू राहील. ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवड्याला हा कर्फ्यू सुरू राहील
हा विकेन्ड कर्फ्यू शुक्रवारी रात्री १०.०० वाजता सुरू होईल तो सोमवारी सकाळी ६.०० वाजपेर्यंत चालेल
पाच दिवस लोकांनी काम करावं परंतु विकेन्डला मात्र घराबाहेर पडू नये. रुग्णालय, विमानतळ, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन जाणाऱ्यांना विकेन्ड कर्फ्यू दरम्यान वैध तिकीट दाखवल्यानंतर सूट मिळेल.
मॉल, जिम, स्पा आणि ऑडिटोरियम बंद ठेवण्यात येतील. आठवडे बाजार प्रत्येक भागात एकाच ठिकाणी सुरू राहील. आठवडे बाजारात जास्त गर्दी होऊ नये यासाठी खास व्यवस्था करण्यात आलीय
सिनेमा हॉल, रेस्टॉरन्ट सुरू राहतील परंतु त्यांच्यावरही काही निर्बंध असतील. सिनेमा हॉलला क्षमतेच्या ३० टक्के उपस्थितीत सुरू ठेवता येईल. रेस्टॉरन्टमध्ये बसून खाण्याची परवानगी नाही. परंतु, होम डिलिव्हरीला मुभा देण्यात आलीय
अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडण्याची परवानगी मिळेल. परंतु, यासाठी कर्फ्यू पास असणं आवश्यक आहे
विवाह समारंभ, अंत्यसंस्कार यांसारख्या गोष्टींसाठी कर्फ्यू पास दिला जाईल. या कार्यक्रमांत निश्चित करण्यात आलेल्या संख्येनुसार उपस्थिती राहील
दिल्लीत बुधवारी एकाच दिवशी १७ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यानंतर आज लगेचच मुख्यमंत्र्यांनी विकेन्ड लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. गेल्या २४ तासांत दिल्लीत १०४ मृत्यू नोंदविण्यात आलेत. आतापर्यंत राजधानीत ११ हजार ५४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर ५० हजार ७३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिल्लीत बेडसची कमतरता नाही. परंतु, काहींना ठराविक रुग्णालयातच दाखल होण्याची इच्छा असते आणि ते रुग्णालयातील बेडस् अगोदरच भरलेले असतात त्यामुळे समस्या समोर येत आहेत, असे ही केजरीवाल यांनी नमूद केले. दिल्लीत अद्यापही पाच हजारांहून अधिक बेडस रिकामे असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. गरज पडल्यास बेडसची संख्या आणखी वाढवता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading