Saturday, May 30, 2026
PUNE

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ‘सूर्यदत्ता’मध्ये अध्ययन केंद्र स्थापन

पुणे : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, संविधान पूजन करून अभिवादन करण्यात आले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘सूर्यदत्ता’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्ययन केंद्र, १३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व संविधानावर क्रेडिट कोर्स सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली.


याप्रसंगी ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा सचिव सुषमा चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. मोनिका हजारे, प्रा. मधू मलिक, प्रा. मिलीना राजे, नयना गोडांबे, सचिन मेने, महादेव मताले यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा देण्यासह अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क मिळवून दिला. शिक्षणानेच आपली प्रगती होऊ शकते, असे सांगत डॉ. आंबेडकरानी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र सुरु करत आहोत. या अध्ययन केंद्रांतर्गत वंचित घटकांतील गरीब, गरजू व होतकरू १३० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.


“सूर्यदत्तामध्ये चालणाऱ्या ज्युनिअर कॉलेजपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच भारतीय संविधानाच्या अभ्यासासाठी ‘सूर्यदत्ता’तर्फे यावर्षीपासून क्रेडिट कोर्स व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीला डॉ. आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच अध्ययन केंद्रांतर्गत डॉ. आंबेडकर यांच्यावरील पुस्तक वाचन, निबंध स्पर्धा, चर्चासत्रे, तज्ज्ञांची व्याख्याने आदी आयोजिली जाणार आहे,” असेही प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.


प्रास्ताविकात शशिकांत कांबळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त संघर्ष समितीच्या वतीने गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी प्रतिसाद देत १३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading