Saturday, June 6, 2026
PUNE

फ्लो पुणे चॅप्टरने बनविला कौटुंबिक हिंसाचारावर लघुपट

पुणे, दि. २७ – कौटुंबिक हिंसाचाराविरुध्द, शारीरिक हिंसाचाराविरुद्ध महिलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ (फ्लो), पुणे चॅप्टरने ‘स्वमान से’ अर्थात सन्मानाने या लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटाचे अनावरण शुक्रवारी फ्लो पुणे चॅप्टरच्या ऑनलाईन वार्षिक स्नेहमेळाव्यात चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष उषा पूनावाला, माजी अध्यक्षा वर्षा तलेरा, सबिना संघवी, वर्षा चोरडिया, संगीता लालवाणी, रितू छाब्रिया आदी उपस्थित होते.

या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन फ्लो पुणे चॅप्टरच्या सदस्य दीप्ती घाटगे यांचे असून चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. सणस व नीरु गोयल या निर्मात्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात समाजात विशेषतः उच्च मध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले असल्याचे यावेळी सणस यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, “मला वाटते की ही समस्या समाजापुढे उघडपणे आणायला हवी. ज्या महिलांना मदतीची गरज आहे, ज्या मदत मागत आहेत त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण सामाजिक दबाव आणत या शारीरिक अत्याचारातून बाहेर पडण्यास मदत केली पाहिजे.”

लघुपटाची सुरुवात एका लग्न प्रसंगाने केली आहे. ज्यात 3 जणांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होते. आशा जी नायिका आहे ती अन्य सामान्य स्त्रियांप्रमाणेच आपल्या जखमा, अत्याचार लपवत असते. परंतु बहिणीच्या लग्नात ती पण यातून बाहेर पडण्याचे धाडसी पाऊल उचलत नव्या जीवनाची सुरुवात करते. कौटुंबिक हिंसाचार हा विषय यात मांडलेला असला तरी पिडीतेचा नवरा किंवा प्रत्यक्ष हिंसाचाराचे प्रसंग न दाखवता केवळ शरीरावरील जखमांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावशालीरित्या विषयाची मांडणी करण्यात आली आहे.

याविषयी घाटगे म्हणाल्या, “भारतातील महिंलावर होणाऱ्या सर्वाधिक गुन्ह्यांमध्ये क्रमांक एक वर बलात्कार नव्हे तर कौटुंबिक हिंसाचार आहे.  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालानुसार लॉकडाऊनच्या काळात एप्रिल २०२० मध्ये केवळ नोंद झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये १०० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे या लघुपटाद्वारे आम्हाला हा विषय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणून त्याविषयी समाजात संवाद घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

याशिवाय या वार्षिक स्नेह मेळाव्यात गेल्या वर्षाभरात डॉ. सणस यांच्या अध्यक्षतेखाली फ्लो पुणे चॅप्टरने केलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. “या वर्ष २०२० मधील कोरोनाच्या काळात आम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे आम्हाला आमच्या क्षमता तपासून पाहण्याची संधी मिळाली. त्या अधिक ताणत आम्हाला आमच्या नव्या वाटा सापडल्या. नवी शक्तिस्थाने समजली,” अशा भावना सणस यांनी व्यक्त केल्या.

मागील वर्षी फ्लो पुणे चॅप्टरने तृतीय पंथीयांना किराणा सामान, होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप, गाव दत्तक घेणे, पक्के स्वच्छतागृह बंधणे, महिला उद्योजीकांसाठी कार्यशाळा, कौशल्य विकास कार्यक्रम, वृक्षारोपण, रोबोटिक्स कीटचे विद्यार्थिनींना वाटप असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबविले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading