‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’ च्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ. अनीश शहा यांची नियुक्ती
मुंबई, दि. 26 – भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक आणि जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीच्या संचालक मंडळाने घोषित केले, की कंपनीचे उप-व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य वित्तीय अधिकारी डॉ. अनीश शहा यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर येत्या 2 एप्रिल 2021 पासून करण्यात येत आहे.
कंपनीच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबद्दल यापूर्वी, दि. 20 डिसेंबर 2019 रोजी निर्णय घेण्यात आले होते. येत्या नोव्हेंबरमध्ये, श्री. आनंद महिंद्रा हे अ-कार्यकारी अध्यक्ष हे पद स्वीकारतील, तेव्हा डॉ. अनीश शहा हे महिंद्रा समूहाच्या इतिहासातील पहिले व्यावसायिक एमडी व सीईओ होतील आणि त्यांच्याकडे महिंद्रा समुहातील सर्व व्यवसायांची संपूर्ण जबाबदारी येईल.
डॉ. पवन गोएंका हे येत्या दि. 2 एप्रिल 2021 पासून ‘एम अँड एम’च्या एमडी, सीईओ व संचालक या पदांवरून सेवानिवृत्त होतील. एमडी व सीईओ या पदांवरून त्यांनी ऑटोमोबाईल आणि फार्म इक्विपमेंट या विभागांची जबाबदारी सांभाळली. कंपनीचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर हे या क्षेत्रांचा यापुढे संपूर्ण कार्यभार स्वीकारतील आणि डॉ. शहा यांना रिपोर्ट करतील.
महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “पवन यांच्या सत्तावीस वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या कामाला मी संचालक मंडळाच्या वतीने अभिवादन करतो. त्यांच्यामुळे कंपनीची चांगली प्रगती झाली. गेल्या वर्षभरात त्यांनी पदांचे संक्रमण शक्य तितक्या सुलभतेने आणि अखंडपणे केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”
आनंद महिंद्रा पुढे म्हणाले, “गेल्या 75 वर्षांत आम्ही यशस्वी झालो आणि प्रगती करू शकलो, याचे एक कारण म्हणजे, योग्य वेळी योग्य ते बदल घडवून आणण्यात आम्ही जाणकार आहोत. अनीश हे महिंद्र समुहासाठी योग्य नेते आहेत. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने त्यांच्याकडे महिंद्रा समुहातील सर्व व्यवसायांच्या पर्यवेक्षणाची संपूर्ण जबाबदारी असेल. यामध्ये, आमचे जागतिक व्यवसाय, परिवर्तनीय धोरणे आणि अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचा समन्वय व संचालन या बाबींचा समावेश असेल. ‘महिंद्रा’च्या ‘राईज’ या संकल्पनेस मूर्त स्वरुप देण्याचे काम अनीश करीत आहेत. एक अपवादात्मक नेतृत्त्वाची कारकीर्द, मोठा आंतरराष्ट्रीय अनुभव आणि ग्राहक, भागीदार व कर्मचारी यांच्याशी दीर्घकालीन संबंध जोडण्याची अनोखी क्षमता अशी गुणवत्ता अनीश यांच्याकडे आहे. माझा विश्वास आहे की, भविष्यात महिंद्राचे नेतृत्त्व करण्यासाठी त्यांच्याइतकी चांगली व्यक्ती दुसरी कोणीही नाही.”
आपल्या नियुक्तीबाबत बोलताना डॉ. अनीश शहा म्हणाले, “महिंद्र समुहाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. हा माझा मोठाच सन्मान आहे. महिंद्रा समूह ही एक विलक्षण संस्था आहे. तिची खरी संपत्ती तिच्या लोकांमध्ये आहे. हे लोक कंपनीच्या मूलभूत मूल्यांचे मूर्त स्वरुप धारण करतात आणि दररोज आपले उद्दिष्ट पार पाडतात. आनंद आणि माझ्या इतर सर्व सहकाऱ्यांसह प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिण्यासाठी, आमच्या भागधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, तसेच त्या सर्वांना ‘राईज’ होण्यास सक्षम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
