fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENT

‘खिसा’च्या खिशात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

  • नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरणाऱ्या ‘खिसा’ या लघुपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार पटकावला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन राज मोरे यांनी केले असून लेखन कैलास वाघमारे यांनी केले आहे. हा लघुपट खेडेगावातील संकुचित दृष्टिकोनावर भाष्य करणारा असून एका लहान मुलाची मन हेलावून टाकणारी ही कथा आहे. या लघुपटात कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ‘खिसा’चे दिग्दर्शक राज मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ”आपल्या सर्वांनाच माहित आहे, की वर्षभरात ‘खिसा’ जगभर गाजतोय. जगभरातील अनेक मोठमोठ्या फिल्मफेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रिमिअरचा बहुमान पटकावल्यानंतर भारतातही ‘खिसा’ने अनेक फिल्म फेस्टिवलवर आपली मोहोर उमटवली आणि आता तर राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्यामुळे माझ्यासाठी ही खूपच आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. ‘खिसा’साठी नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार मला मिळाला आहे. मात्र हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो संपूर्ण टीमला मिळाला आहे. कारण त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते. त्यामुळे सगळ्या ज्युरींसह मी संपूर्ण टीमचेसुद्धा आभार मानतो. एवढा मानाचा पुरस्कार मिळाल्याने आता जबाबदारीही तितकीच वाढली आहे. त्यामुळे भविष्यातही अधिक आशयपूर्ण चित्रपट देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असू.”

‘खिसा’ या मराठी लघुपटाची गोव्यात होणाऱ्या ५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही निवड झाली होती. इस्तंबूल फिल्म अवॉर्ड्स २०२०मध्ये या लघुपटला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार मिळाले होते. कॅनडाच्या मॉन्ट्रियल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल, २६व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डायोरोमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, अर्जेंटिनाच्या डायोरोमा इंडी शॉर्ट्स अवॉर्ड्स, ब्युनोस आयर्स, येथील महोत्सवांतही ‘खिसा’ची निवड करण्यात आली आहे. तुर्कस्थानातील इस्तंबूल येथे मार्च २०२१मध्ये होणाऱ्या आयएफएच्या वार्षिक लाइव्ह स्क्रीनिंग मेळाव्यात प्रतिष्ठित अशा गोल्डन स्टार पुरस्कारासाठी हा लघुपट पात्र ठरला आहे. तर डब्लिन इंटरनॅशनल शॉर्ट अँड म्युझिक फेस्टिव्हल २०२०मध्ये ‘खिसा’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकन मिळाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading