PMP ची दत्तवाडी ते महात्मा फुले मंडई बससेवा सुरू

पुणे, दि. १४ – पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक ५५ अ दत्तवाडी (पानमळा) ते महात्मा फुले मंडई हि बससेवा रविवार दि. १४ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे,पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेविका अनिता कदम यांच्या शुभहस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले.

पुणे मनपा प्रभाग क्रमांक २९ चे अध्यक्ष अर्जुन खानापुरे, सरचिटणीस मनोज पोटे यांच्या पाठपुराव्यामुळे हि बससेवा सुरू झाली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार, पर्वती विधानसभा मतदार संघाच्या महिला आघाडी अध्यक्षा जयश्री बहुलेकर, प्रसाद बहुलेकर, संतोष कदम, गणेश ठाकर, शंकर मोटे, पीएमपीएमएलचे वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, स्वारगेट आगार व्यवस्थापक राजेश कुदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बससेवेचा मार्ग दत्तवाडी, वृंदावन नर्सरी, पानमळा, म्हसोबा चौक, सेनादत्त चौक, अलका टॉकीज, कुमठेकर रस्ता, शनिपार, महात्मा फुले मंडई असा असेल.

यावेळी बोलताना शंकर पवार म्हणाले, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी पीएमपीएमएल ची सूत्रे हातात घेतल्यापासून कामाचा धडाका लावलेला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन बसमार्ग सुरू करून प्रवाशांना दिलासा देऊन उत्पन्न वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. तसेच कामगारांचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावून कामगारांना सुध्दा त्यांनी न्याय दिला आहे.

उपमहापौर सरस्वती शेंडगे म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे पीएमपीएमएलची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी पीएमपीएमएल चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप व सर्व अधिकारी यांच्याकडून जे प्रयत्न सुरू आहेत ते खरोखरीच कौतुकास्पद आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: