PMP बस थांब्यांवर अनधिकृत जाहिराती लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे, दि. १८ – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस थांब्यांवर अनधिकृत जाहिराती लावून महामंडळाच्या बस थांब्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्ती, कंपनी व संस्था यांच्या विरुद्ध स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये कलम ३ नुसार सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, स्वारगेट आगाराकडील कार्यक्षेत्रात असलेल्या स्वारगेट पुलाखालील असलेला बस थांबा व पुणे स्टेशनसाठी ज्या बस थांब्यावरून बस सुटतात या दोन्ही बस थांब्यांवर महामंडळाची परवानगी न घेता अनधिकृत जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमुळे बस थांब्यांचे विद्रुपीकरण होऊन बस थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी लावलेली बसमार्ग व वेळापत्रकाची माहिती प्रवाशांना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. स्वारगेट आगाराचे कार्यालय अधिक्षक सुनिल कांबळे यांनी अनधिकृत जाहिराती लावणाऱ्या व्यक्ती, कंपनी व संस्था यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. यापुढे अशा अनधिकृत जाहिराती पीएमपीएमएल च्या बस थांब्यांवर आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल.

ज्या बस थांब्यांवर अनधिकृत जाहिराती लावण्यात आल्या आहेत त्या बस थांब्यांना स्वारगेट पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जमदाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. अनधिकृत जाहिरातींवर जे मोबाईल नंबर आहेत, त्या मोबाईल नंबर धारकांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपणार व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार केंजळे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: