Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRATOP NEWS

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार – अमित देशमुख

मुंबई दि. 9 : गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथे सुद्धा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यामुळे येणाऱ्या काळात या चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे आर्किटेक्ट इंद्रजीत नागेशकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, कोल्हापूरची चित्रनगरी कात टाकत असून येथे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात केलेल्या कामांमुळे आज येथे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण सुरु आहे. कोल्हापूरची चित्रनगरी विकसित झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपट आणि मालिकांची संख्या वाढू शकते आणि त्याचा फायदा कलाकारांसह तंत्रज्ञ कलाकारांनाही  होणार आहे. येणाऱ्या काळात चित्रीकरणासाठी आवश्यक असणारे सेटस कायमस्वरुपी उभारणे, कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी वसतीगृहे उभारणे यावर भर देण्यात यावा.

थोर समाजसुधारकांवर सिनेमे बनविण्यात येणार

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, आजच्या‍ पिढीला थोर समाजसुधारकांचे महत्त्व आणि त्यांनी केलेले कार्य समजण्यासाठी थोर समाजसुधारकांवर सिनेमे बनविण्यात येणार आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर अशा महनीय व्यक्तींवरील सिनेमा बनविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग यासाठी पुढाकार घेईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading