रंगावलीतून ‘मूकनायक’ चा १०१ वा वर्धापनदिन साजरा

पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून तळागाळातील वंचित समाजाच्या वेदनांना प्रगट करण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचलले. या मूकनायक वर्तमानपत्राची सुरुवात ३१ जानेवारी १९२० रोजी झाली होती. त्या घटनेच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्त रंगावलीतून डॉ.आंबेडकर यांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. 

इतिहास प्रेमी मंडळातर्फे सिंबायोसिस संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अ‍ँड मेमोरिअलमधील अभ्यासिकेच्या प्रांगणात ८ बाय ६ आकारातील डॉ.आंबेडकर व मूकनायक वृत्तपत्राच्या मुखपृष्ठाची रंगावली रेखाटण्यात आली. यावेळी सिंबायोसिस संस्थेचे पद्मभूषण प्रा.डॉ.शांब.मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, सी.आर.पाटील, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. सुप्रसिद्ध रंगावलीकार प्रा.अक्षय शहापूरकर यांनी १२ तासांच्या कालावधीत ही रंगावली रेखाटली. ही रंगावली दोन दिवस पाहण्याकरिता खुली आहे.  

डॉ.शां.ब.मुजुमदार म्हणाले, मूकनायक सारख्या वृत्तपत्राची जयंती आपण साजरी करीत आहोत, याचा आनंद आहे. डॉ.आंबेडकर हे प्रखर, व्यासंगी, ग्रंथप्रेमी, विचारवंत आणि पत्रकार होते. समाजात ज्यांचा आवाज दबलेला होता, त्यांचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचविण्याचे माध्यम म्हणून त्यांनी मूकनायक सुरु केले. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मूकनायक हे वृत्तपत्र म्हणून उत्तम माध्यम होते. शिका, वाचा आणि संघटीत व्हा, हा विचार त्यांनी वृत्तपत्रातून मांडला. 
मोहन शेटे म्हणाले, मूकनायक हे पाक्षिक होते. मुक्या समाजाचे मूकनायक हे प्रतिनिधीत्व करीत होते. मूकनायक वृत्तपत्राला दिर्घकाळ लाभला नाही. मात्र, त्यामाध्यमातून केलेले कार्य महत्वाचे आहे. चुकीच्या रुढींवर शब्दांचा प्रहार करण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी मूकनायक च्या माध्यमातून केले. त्यामुळे मूकनायक च्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्त रंगावलीतून ऐेतिहासिक घटनेला उजाळा देण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: