जगावे कसे याचा आदर्श प्रबोधनकार ठाकरे – डॉ. निलम गोर्हे
पुणे : प्रबोधनकारांमुळे महाराष्ट्रात स्त्रीयांची प्रगती झाली. प्रबोधनकार म्हणजे राजकारण आणि समाजकारणाचा संमग होते, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी केले.
ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवाानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत बालगंधर्व कलादालनात व्यंगचित्र आणि अर्कचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज गोर्हे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, प्रबोधन युवा शक्तीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, सचिन इटकर, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, किरण साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेनाप्रमुख यांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे, प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन तसेच प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकातील त्यांचे विचारदर्शन घडविणारी ‘प्रबोधनी विचारांच्या ठिणग्या’ ही मालिका, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘कार्टून कट्टा’चे घनश्याम देशमुख, विनय चाणेकर यांच्यासह देशातील 75हून अधिक व्यंगचित्रकारांच्या ‘आमचेही फटकारे’ या व्यंगचित्र व अर्कचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. राज्य शासनाच्या ग्रंथालयातर्फे प्रबोधकार ठाकरे संमग्र वाङमयाचे पाच खंड तसेच लक्ष्मण राठिवडेकर यांच्या शब्दगंध प्रकाशनतर्फे प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे याचे साहित्य एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 26 पर्यंत खुले असणार आहे.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, प्रबोधनकारांच्या संस्कारांनी शिवसेनेला संवेदनशिल, सर्वव्यापी केले. प्रबोधनाची आवश्यकता इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात आहे. प्रसार माध्यमातून हे काम करणे आपल्याला शक्य आहे. प्रबोधनास अप्रत्यपणे विरोध करणार्या शक्ती अजूनही दबा धरून बसलेल्या आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी एक लाक 51 हजार रुपयांची मदत डॉ. गोर्हे यांनी या प्रसंगी जाहीर केली.
डॉ. करमळकर म्हणाले, प्रबोधनकारांची नवीन पिढीला ओळख होणे, त्यांचा इतिहास माहिती होणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रबोधनकार म्हणेज जगावे कसे असा आदर्श म्हणून पाहिले जातात. व्यंगचित्र म्हणजे जे तुम्ही अगदी 5 ते 10 पानातही सांगू शकणार नाही ते एका चित्रात सांगता येते. ही कला पुढे जोपासली गेली पाहिजे. विद्यार्थ्याला हे कळले पाहिजे की करिअर कशातही होऊ शकते. त्याने सर्वस्व दिले तर कोणत्याही क्षेत्रात करिअर होऊ शकते, व्यंगचित्राचे क्षेत्रही आहेच. दोन पिढ्यांच्या संस्कृतीची जी जडण घडण आहे ज्यांनी महाराष्ट्रासाठी भरपूर दिले यांची नव्या पिढीला चांगली ओळख होईल ही खात्री वाटते. या गोष्टी समाजात रूजविल्या पाहिजेत. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे विद्यापीठात व्यंगचित्रांचे दालन
विद्यापीठामध्ये अडीच ते तीन हजार व्यंगचित्रांचे दालन तयार आहे, कोविडच्या संकटामुळे त्याचे उद्घाटन होऊ शकलेले नाही. प्रबोधनकारांनी दाखविलेल्या वाटेवरून चालत असताना जी दोन अध्यासने केली आहेत ज्यात अनुसूचित जातीच्या सामाजिक प्रश्नांसाठी अभ्यासकेंद्राची सुरुवात केली आहे. मराठा साम्राज्याचे इतिहास केंद्रही पुणे विद्यापिठामध्ये सुरू केले असल्याचे डॉ. करमळकर म्हणाले.
प्रबोधकारांचे कार्य संपूर्ण राज्याप्रमाणे देशाच्या कानाकोपर्यातही पोचावे, अशी अपेक्षा रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केली.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विषद करून प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले.
सचिन इटकर म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी सुनील महाजन यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. प्रबोधनकारांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
चित्रकार-व्यंगचित्रकारांचे सन्मान डॉ. गोर्हे आणि डॉ. करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुनील मते यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. मान्यवरांचा सत्कार सुनील महाजन, किरण साळी निकिता मोघे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले.
