fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTMAHARASHTRAPUNETOP NEWS

यंदाचा PIFF होणार ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ सुद्धा

‘फ्रंटलाईन वॉरियर्स’ला महोत्सव समर्पित

पुणे, दि. २०- चित्रपट रसिक ज्याची आतुरतेने वाट पहात असतात असा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ यावर्षी येत्या ४ ते ११ मार्च दरम्यान होणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जात असून यंदा या महोत्सवाचे 19 वे वर्ष आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातूनही सिनेरसिकापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे पुण्यासाह आता जगभरातील सिनेरसिक या महोत्सवाचा आनंद घेऊ शकतील.

पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आदी यावेळी उपस्थित होते. या महोत्सवासाठी यावर्षी ९३ देशांमधून तब्बल १६११ चित्रपट प्राप्त झाले आहेत. ज्यापैकी विविध विभागातील तब्बल १८० चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांना महोत्सवा दरम्यान घेता येणार आहे.


यावेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “मागील २०२० हे वर्ष आपल्या सर्वांसाठी एक प्रकारची अनिश्चितता, भीती आणि अर्थात संघर्षाचे होते. मात्र आता एक आशा घेऊन आपण सर्वांनीच २०२१ मध्ये पाऊल टाकले आहे. सोबतच या परिस्थितीत अग्रस्थानी कार्यरत असलेल्या ‘कोविड वॉरियर्स’च्या कष्टाचे चीज होऊन, सर्वत्र लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात येत पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे आता, सिनेरसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान असलेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहोत. चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून यावर्षीचा महोत्सव होणार असून कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर महोत्सवावेळी असणा-या सर्व सरकारी नियमांचे पालन करीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोविड काळात अग्रस्थानी असलेल्या ‘फ्रंटलाईन वॉरियर्स’ला आम्ही यावर्षी हा महोत्सव समर्पित करीत आहोत.’’

गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी महोत्सवास रुपये ४ कोटींचे अनुदान जाहीर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या आयोजकांनी यंदा अडीच कोटी इतकेच अनुदान द्यावे अशी विनंती स्वत:हून राज्य सरकारकडे केली. त्याचा आनंदाने स्वीकार करीत सरकारने यावर्षी अडीच कोटी रुपये अनुदान म्हणून देण्याचे मान्य केले आहे, असेही डॉ. पटेल यांनी नमूद केले. याशिवाय आयोजकांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्याच्या इतर शहरांमध्ये देखील चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये यंदा मुंबई व नागपूर बरोबर लातूर येथे देखील चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading