पीएमपीच्या वाहक व चालकांनी ४० हजार रुपये किंमतीचा मोबाईल प्रामाणिकपणे केला परत
पुणे, दि. १९ – पीएमपीएमएल च्या स्वारगेट आगारातील सेवक दत्तात्रय कोळपे ( कायम वाहक क्र. १२९१ ) व सुनिल शेलार (चालक क्र. ४१९६) यांना दि. १८ जानेवारी २०२१ रोजी सकाळ पाळीत मार्ग क्रमांक ११७/११ या मार्गावर कर्तव्य बजावत असताना ईशा जोशी यांचा अँपल कंपनीचा ४० हजार रुपये किंमतीचा आय फोन मोबाईल सापडला. वाहक दत्तात्रय कोळपे व चालक सुनिल शेलार यांनी खातरजमा करून ईशा जोशी यांना कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांच्या समक्ष प्रामाणिकपणे मोबाईल परत केला. वाहक दत्तात्रय कोळपे व चालक सुनिल शेलार यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे ईशा जोशी यांनी त्यांना मिठाईचे बॉक्स देऊन आभार मानले. कोळपे व शेलार यांचे कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांनी कौतुक करून अभिनंदन केले. तसेच यामुळे पीएमपीएमएलच्या नावलौकिकात भर पडल्याचे गौरव उदगार देखील सतिश गाटे यांनी काढले.
