“मै भी डिजिटल” उपक्रमाचे विश्रांतवाडीत युनियन बँक ऑफ इंडिया येथे आयोजन
पीएम स्वनिधी योजनेच्या 47 पथविक्रेत्यांना क्यू आर कोड चे वाटप
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य कष्टकरी व पथविक्रेते यांच्यासाठी “पीएम स्वनिधी” योजनेअंतर्गत दहा हजार रुपयाची कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत संपूर्ण देशभरातून 30 लाख अर्ज कर्ज मागणीसाठी आलेले होते. त्यामधील सोळा लाख लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात 12 लाख पथ विक्रेत्याना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे कर्ज वितरित करण्यात आलेले आहे.
लाभार्थ्यांनी त्यांचे बँकिंग व्यवहार कॅशलेस स्वरूपात करावेत, त्यासाठी त्यांना क्यूआर कोड देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात केवळ 20 टक्के लाभार्थी त्याचा वापर करत आहेत. कॅशलेस बँकिंग सुविधेसाठी डिजिटल क्यूआर कोड चा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा याकरिता “मै भी डिजिटल” हा उपक्रम केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. त्याची जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी विश्रांतवाडी येथील युनियन बँक ऑफ इंडिया यासाठीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे विभागातील 293 लाभार्थ्यांपैकी विश्रांतवाडी येथील 47 लाभार्थ्यांना क्यूआर कोड चे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा अग्रणी बँकेचे वरिष्ठ जिल्हा व्यवस्थापक आनंद बेडेकर, जिल्हा वित्तीय साक्षरता अधिकारी पी. एस.सरडे, युनियन बँकेचे उपमहाव्यवस्थापक टी. गुरु प्रसाद, क्षेत्रीय कार्यालय आर्थिक समादेशन विभाग प्रमुख प्रशांत तळेकर यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी धोंडीराम गायकवाड, विजय मुंडे,रश्मी गुप्ता, विश्रांतवाडी शाखा व्यवस्थापक आरएस त्र्यंबके, शाखा व्यवस्थापक कुंदन कुमार उपस्थित होते. या वेळी संबंधित लाभार्थ्यांना “मे भी डिजिटल” या अभियानाची संपूर्ण माहिती देण्यात आली. कॅशलेस व्यवहार तसेच क्यू आर कोड चा वापर याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. लाभार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन देखील उपस्थित वरिष्ठ अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय तसेच विश्रांतवाडी शाखेच्या वतीने करण्यात आले होते.
