वंचितच्या अंजली पाटील या ट्रान्सजेंडर उमेदवाराचा ऐतिहासिक विजय
जळगाव,दि . १८ : जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज ऐतिहासिक निकाल लागला आहे. येथील वार्ड क्र. 4 मधून वंचित बहुजन आघाडीच्या अंजली पाटील या ट्रान्सजेंडर उमेदवार विजयी झाल्या आहेत. यामुळे पाटील या येथील राजकारतील पहिल्या ट्रान्सजेंडर प्रतिनिधी बनल्या आहेत.
या निवडणुकीसाठी अंजली पाटील यांनी जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 4 येथील जागा महिला खुल्या वर्गांसाठी राखीव होती. त्यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज अंजली यांनी दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला होता. तृतीयपंथी असल्यानं अंजली पाटील यांना महिला प्रवर्गातून उमेदवारी दाखल करता येणार नाही, मतदार यादीतही त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजली यांनी माघार घेतली नाही. नाही. त्यांनी आपली सहकारी तृतीयपंथी शमीबा जान हिच्या मदतीनं न्यायासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावलं. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने तिचा न्याय मिळाला. हायकोर्टाने त्यांचा अर्ज वैध ठरवून निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दिला. अन् आज त्यांनी निवडून निकालात बाजी मारली.
