Saturday, June 13, 2026
BusinessPUNE

कामगारांसाठी असणाऱ्या सर्वोत्कृष्ट सुविधांसाठी क्रेडाईच्या वतीने पुरस्कार प्रदान

पुणे, दि. ६ – आपली सुंदर घरे बांधून देणा-या बांधकाम कामगारांसाठी किमान योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याबरोबरच या सुविधांबद्दल बांधकाम व्यवसायिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल या उपक्रमाअंतर्गत ‘बेस्ट फॅसिलिटी अॅवॉर्ड २०२०’ (सर्वोत्कृष्ट सुविधा पुरस्कार २०२०) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेतील विजेत्यांना आज क्रेडाई राष्ट्रीयचे अध्यक्ष सतीश मगर यांच्या हस्ते पुरस्कार देत गौरविण्यात आले. याबरोबरच उपक्रमाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, उपाध्यक्ष व स्पर्धेचे संयोजक किशोर पाटे, कुशल उपक्रमाचे प्रमुख व क्रेडाईच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, सदस्य मिलिंद तलाठी आदी या वेळी उपस्थित होते.

कामगारांची राहण्याची व्यवस्थेसाठी बांधकाम विकसक या विभागात ३०० हून अधिक कामगार असलेल्या श्रेणी ३ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लि., श्रेणी २ (१०१ ते ३०० कामगार असलेल्या साईट्स) मध्ये प्राईड पर्पल गृप, तर श्रेणी १ मध्ये (२१ ते १०० कामगार असलेल्या साईट्स)मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लि यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

बांधकाम विकसक व कंत्राटदार या विभागात श्रेणी ३ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लि. व मिलेनियम इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि यांना, श्रेणी २ मध्ये प्राईड पर्पल गृप व बिल्डक्यू  कन्स्ट्रक्शन प्रा. लि यांना तर श्रेणी १ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लि. व विराज आय प्रोजेक्ट्स लि. यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय स्पर्धेच्या विशेष पारितोषिक विभागात कामगारांचे सर्वाधिक बीओसीडब्लू रजिस्ट्रेशन करणा-या पंचशील रिअल्टी व पेगासस प्रॉपर्टीज प्रा. लि (कुमार प्रॉपर्टीज) या दोघांना प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट स्वच्छतेसाठी गोदरेज प्रॉपर्टीज लि. यांना प्रथम तर रोहन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. यांना द्वितीय पारितोषिक देत सन्मानित करण्यात आले. सुरक्षा व स्वच्छता प्रकारात रोहन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि., सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण सुविधा प्रकारात फरांदे स्पेसेस यांना सर्वोत्कृष्ट नवसंकल्पनेसाठी वॅसकॉन इंजिनिअर्स लि. यांना तर सर्वोत्कृष्ट कोविड सुविधेसाठी कोलते पाटील लि. यांना सन्मानित करण्यात आले.              

या वेळी बोलताना सतीश मगर म्हणाले, “अशा पद्धतीची स्पर्धा ही क्रेडाई पुणे मेट्रोने यशस्वीरित्या घेऊन दाखवली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पुण्यात घडणा-या गोष्टींची दखल ही देशपातळीवर घेतली जाते, त्यामुळे ही स्पर्धा आणि त्याचा उद्देश संपूर्ण देशात पोहोचेल आणि त्यामुळे कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी मिळणा-या सोयी आणि त्याबद्दलची जागरूकता यामध्ये सकारात्मक बदल होईल, असा मला विश्वास आहे. आपली सुंदर घरे उभारणारे कामगार अनेकदा त्या बांधकामाच्या जागेवर भिंतीच्या आस-याला राहत असतात, हे बांधकाम क्षेत्रातील कटू सत्य आहे. याच कामगारांसाठी असलेल्या सोयी जगाला दाखविण्याचे धारिष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या बांधकाम व्यवसायिकांनी दाखविले, हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या क्षेत्रातील ही काळी बाजू जगाला दाखवायला धैर्य लागत आणि ते क्रेडाई पुणे मेट्रो आणि कुशल क्रेडाई यांनी दाखविले याचे मला कौतुक आहे. ”

ज्याप्रमाणे आपण ग्राहकांची, त्यांच्या गरजांची काळजी घेतो, त्याप्रमाणेच बांधकाम कामगारांची, त्यांना लागणा-या सुविधांची काळजी घेणे देखील गरजेचे असल्याचे मत सुहास मर्चंट यांनी व्यक्त केले.

बेस्ट फॅसिलिटी अॅवॉर्ड २०२०’ या स्पर्धेमध्ये कामगारांच्या राहण्याची व्यवस्था, शौचालये, आरोग्य तपासणी, अत्यावश्यक सेवांची उपलब्धता, कोविड काळात घ्यावयाची काळजी, देण्यात येणारे प्रशिक्षण, कामगारांच्या मुलांसाठी क्रेच व मध्यान्ह भोजन व्यवस्था, मनोरंजनाच्या सोयी आदी बाबी विचारात घेतल्या गेल्या. सदर स्पर्धेमध्ये पुण्यातील एकूण ८७ बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला. यामधून पात्र ठरलेल्या २० बांधकाम साईट्सची पाहणी करीत पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशनच्या (पीसीईआरएफ) तज्ज्ञांनी अंतिम विजेते ठरविले.

स्पर्धेचा निकाल विस्तृतपणे –  

बांधकाम विकसक विजेते – (कामगारांची राहण्याची व्यवस्था)

श्रेणी ३ (३०० हून अधिक कामगार)
– गोदरेज प्रॉपर्टीज लि (प्रथम)
– पंचशील रिअल्टी (द्वितीय)
– सिटी कॉर्पोरेशन (द्वितीय)

श्रेणी २ (१०१ ते ३०० कामगार)
– प्राईड पर्पल गृप (प्रथम)
– गोदरेज प्रॉपर्टीज लि (द्वितीय)
– रोहन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. (द्वितीय)

श्रेणी १ (२१ ते १०० कामगार)
– गोदरेज प्रॉपर्टीज लि (प्रथम)
– निओ फार्मा प्रा. लि. (द्वितीय)

बांधकाम विकसक व कंत्राटदार या विभागात

श्रेणी ३ (३०० हून अधिक कामगार)
– गोदरेज प्रॉपर्टीज लि. व मिलेनियम इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि (प्रथम)
– पंचशील रिअल्टी (द्वितीय)
– सिटी कॉर्पोरेशन (द्वितीय)  

श्रेणी २  (१०१ ते ३०० कामगार)
– प्राईड पर्पल गृप व बिल्डक्यू कन्स्ट्रकशन प्रा. लि (प्रथम)
– गोदरेज प्रॉपर्टीज लि. व मिलेनियम इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि (द्वितीय)
– रोहन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. (द्वितीय)

श्रेणी १ (२१ ते १०० कामगार)
– गोदरेज प्रॉपर्टीज लि. व विराज आय प्रोजेक्ट्स लि. (प्रथम)
– निओ फार्मा प्रा. लि. व  मिलेनियम इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि (द्वितीय)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading