Saturday, May 30, 2026
PUNE

नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे, दि. 5- नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे  राष्ट्र निर्माणाचा पाया आहेत असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.  राज्यपातळीवरील स्पर्धा नेहरू युवा केंद्र, पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना, क्षेत्रीय कार्यालय पुणेच्या वतीने आयोजीत राज्यस्तरीय युवा संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संसदेच्या केंद्रीय सभागृहात येत्या १२ जानेवारी रोजी होणा-या राष्ट्रीय युवा संसदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.

सामंत म्हणाले, माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासाच्या सुरूवातीला मी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून कामे केलेली आहेत. केंद्राच्या अनेक उपक्रमात मी सहभागी होतो. या माध्यमातून केलेल्या कामांच्या आठवणींना आज उजाळा देत असताना मनस्वी आनंद होत आहे. कोरोना काळात नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतून विजयी झालेले स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरही राज्याचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  भारत हा तरुणांचा देश आहे. ज्या क्षेत्रात काम करायचं आहे तिथे प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्की  मिळत. सकारात्मक राहात सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर सर्वकाही शक्य आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. 

आज झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आयाती पिनाक मिश्रा, प्रतीक रमेशराव ठाकरे आणि सलोनी संजय त्रिवेदी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला आहे. येत्या 12 जानेवारीला संसदेच्या केंद्रीय सभागृहात राष्ट्रीय युवा संसद पार पडणार आहे. या स्पर्धेत राज्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धकांना सहभागाची संधी मिळणार आहे. नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रल्हाद सोनुने, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन, पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी विनीत मालपुरे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या विभागप्रमुख डॉ. जयंती काजळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम सहाय्यक सिद्धार्थ चव्हाण आणि राष्ट्रीय युवा स्वयंसेवक वैभव अनिल अलई यांनी राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे संयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading