भीमा कोरेगावला जाणारच – चंद्रशेखर आझाद
मुंबई:- यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभचं देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे.
कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे भीम आर्मीचे प्रमख चंद्रशेखर आझाद तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.
कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी जायचे आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली नाही, असं चंद्रशेखर आझाद म्हणाले. कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी न्यायलयात जाण्याची गरज लागली तर न्यायालयात जावू, असा इशारा आझाद यांनी दिला. चंद्रशेखर आझाद टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
महाराष्ट्रात सरकार बदललं आहे. मात्र, जादा फरक झालेला नाही. मागील सरकारच्या तुलनेत हे सरकार बरे आहे, असंही चंद्रशेखर आझाद म्हणाले. दरवर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येण्याचा निर्धार केला होता. मात्र, गेल्या वर्षी तुरुंगात असल्यामुळे येता आले नाही. मात्र, यावर्षी कोणत्याही परिस्थिती कोरेगाव भीमाला जाणार असल्याचे चंद्रशेखर आझाद म्हणाले.
