Saturday, June 13, 2026
PUNE

अवयवदानासाठी कार्य करणारे धीरज गोडसे परमेश्वरी कार्यकर्ता – डॉ. पी. डी. पाटील

पुणे : आयुष्याची लढाई लढत असताना उपचार सुरू असलेल्या गरजू रुग्णाला वेळेत अवयव मिळणे खूप गरजेचे असते. नातेवाईकांच्या भावनिक प्रेमामुळे अवयदान करवून घेणे कठिण ठरते. अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता आहे. अवयव दानासाठी धीरज गोडसे यांनी सुरू केलेले कार्य प्रशंसनीय असून ते परमेश्वरी कार्यकर्ता आहेत, असे मत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

अवयवदानासाठी पुढाकार घेतलेल्या कोमल न्यू लाईन फाऊंडेशनचे प्रमुख धीरज गोडसे यांना आडकर फौंडेशनतर्फे पहिला कोमल पवार स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, व्याख्याते विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते आज (दि. 28 डिसेंबर 2020) प्रदान करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षपदावरुन डॉ. पाटील बोलत होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर हे व्यासपीठावर होते. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. पाटील म्हणाले, अवयवदान करताना, करवून घेताना खूप अडचणी येतात. अवयवदानासाठी कुणी सहजासहजी तयार होत नाही. असाध्य रोगाने ग्रासलेल्या पत्नीसाठी गोडसे यांनी केलेल्या कार्याला सीमा नाही. अवयवदानानंतर पत्नीला तीन वर्षे जिद्दीने जगण्यास बळ दिले, अवयवदानाचे कार्य सुरू केले हे पुण्याचेच काम ठरले आहे. अवयवदानामुळे जीवदान मिळालेल्या रुग्णाच्या चेहर्‍यावरील हास्य यापेक्षा दुसरी मोलाची गोष्ट नाही.

अवयवदानासाठीच्या जागृतीचा निर्णय समाजाला दिशा देणारा : अनास्कर

धीरज गोडसे यांचा विचार समाजाला दिशा देऊन जाणारा आहे, असे सांगून विद्याधर अनास्कर म्हणाले, पत्नी ही अर्धांगिनी समजली जाते, कोमल हयात नसली तरी तुझे अर्धे शरीर हे तिचेच आहे. त्यामुळे तुझे अवयवदानाचे काम कोमलच्या आत्म्याला शांती देणारे ठरेल. शारीरिक संपदेबरोबरच मनाच्या ताकदीचे महत्त्व कोरोनाने आपल्याला शिकविले आहे. मनातले विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आरोग्यदायी शरीराचे महत्त्व आहेच, परंतु जेथे मानसिक दुबळेपण येते तेथे सगळेच संपते. ज्या समाजाने मला काही दिले आहे, त्याला काय परत द्यावे असा विचार जेंव्हा मनात येतो तेंव्हा धीरज आणि कोमलने अवयवदानाठी जनजागृतीचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कोमलला एका कार्यक्रमात ऐकले असता तिच्या बोलण्यातून एक वेगळीची उर्जा मिळाल्याचेही अनास्कर यांनी नमूद केले. धीरज आणि कोमलचा अवयवदानासाठीच्या जागृतीचा निर्णय समाजाला नवी दिशा देणारा ठरेल, असे ते म्हणाले.

अवयवदानासाठी जनजागृतीचे कार्य अव्याहत सुरू ठेवणार : धीरज गोडसे

सत्काराला उत्तर देताना धीरज गोडसे म्हणाले, पतीला पत्नीच्या नावाने पुरस्कार मिळणे ही मोठी गोष्ट आहे. आपल्या समाजात स्त्री नेहमी पतीच्या नावे ओळखली जाते. परंतु मला पत्नीच्या नावे हा पुरस्कार मिळतो आहे हे माझ्यासाठी आनंददायी आहे. अवयवदानानंतर कोमलला मिळालेल्या नवीन आयुष्यातील प्रत्येक दिवशी तिने अवयवदात्याला धन्यवाद दिले. अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी 55 लाख रुपये खर्च येणार होता. एवढा पैसा खर्च करूनही तिच्या जगण्याची शक्यता फक्त एक टक्का असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. असे असूनही समाजाने आमच्यासारख्या सामान्य कुटूंबाला मदतीचा हात दिल्याचे गोडसे यांनी आवर्जून सांगितले. अवयव प्रत्यारोपणानंतर कोमलला सहा महिने बोलताही येत नव्हते. परंतु जिद्दीने तिने त्यावर मात केली. फफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होईल, यावर कोणाचाच विश्वास नव्हता. परंतु कोमलच्या ऑपरेशनच्या यशानंतर ही संकल्पना समाजात रुजायला सुरुवात झाली, माझ्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. ऑपरेशनच्या यशानंतरही अल्पायुषी असल्याचे माहिती असूनही कोमलने त्यावर कधीही भाष्य केले नाही. हे जग सोडण्याच्या वाटेवर असतानाही काही क्षण आधीपर्यंत ती अवयवदानाच्या जनजागृतीचे काम नेटाने करत होती, याचा भावनापूर्ण उल्लेख गोडसे यांनी केला. मी माझे आयुष्य अवयव दानाच्या चळवळीसाठी वाहून घेतले आहे आणि हेच काम मी पुढे नेणार आहे, असा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाविषयीची माहिती दिली. त्या वेळी ते म्हणाले, अवयवदानापेक्षा श्रेष्ठ दान दुसरे कोणतेच नाही. अवयवदानामुळे चमत्काराने मिळालेले अल्पायुष्य कोमल पवारने पतीच्या खंबीर साथीने न्यू लाईफ फाऊंडेशन मार्फत अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात घालविले. कोमलचे कार्य धीरज गोडसे यांनीही नेटाने सुरू ठेवले आहे. या कार्याला सलाम म्हणून कोमलच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा कार्यक्रम आयोजित केला.

मान्यवरांचे स्वागत अ‍ॅड. प्रमोद आडकर आणि मैथिली आडकर यांनी केले. सूत्रसंचालन आणि मानपत्र वाचन उद्धव कानडे यांनी केले.

फोटो ओळ : आडकर फौंडेशन आयोजित कोमल पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) अ‍ॅड. प्रमोद आडकर, डॉ. पी. डी. पाटील, पुरस्कारार्थी धीरज गोडसे, विद्याधर अनास्कर, मैथीली आडकर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading