20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचा शुक्रवारी उद्घाटन सोहळा
पुणेः- येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजीत 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी होणार असून या दोन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून साहित्य रसिकांना विविध विषयांवरील परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन अशा भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागाध्यक्ष दिलीप बराटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, सचिव वि.दा. पिंगळे, संचालक देवेंद्र सुर्यवंशी आणि संचालक दिवाकर पोफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या संमेलनाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, यंदा या संमेलनाचे 20 वे वर्ष आहे. मात्र कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर या संमेलनातील केवळ दोन कार्यक्रमांचा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात थेट आस्वाद रसिकांना घेता येणार असून इतर सर्व कार्यक्रम आॅनलाईन स्वरुपात अनुभवता येणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे येथे राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यीक भारत सासणे आणि उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे महापाैर मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. डाॅ. सदानंद मोरे, रा.ग.जाधव, रामचंद्र देखणे, डाॅ. य़शवंत मनोहर, नारायण सुर्वे आदी दिग्गजांनी आजवर या संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेले आहे.
याच दिवशी दुपारी 2.00 (दोन) वाजता ‘साहित्य-कला आणि जातीचे राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार असून राजन खान आणि डाॅ. गणेश मोहिते यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे आॅनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
यानंतर दुपारी 4.00 वाजता प्रा. अाप्पासाहेब खोत आणि डाॅ. प्रतिभा जाधव यांचे कथाकथन होणार असून या कार्यक्रमाचे आॅनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
संध्याकाळी 6.00 वाजता ‘संमेलनाध्यक्षांशी गप्पा’ या कार्यक्रमात 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी डाॅ. वर्षा तोडमल संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे आॅनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
संमेलनात दुस-या दिवशी म्हणजे, शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 (अकरा) वाजता ‘जम्मू काश्मिरमधील ‘कलम 370′ आणि ’35 अ’ हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का?’ या विषयावरील परिसंवादात उल्हासदादा पवार आणि माधव भांडारी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे आॅनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
दुपारी 2.00 (दोन) वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाडी आणि त्यांचे सहकारी ‘भारुडातून प्रबोधन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे आॅनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
यानंतर दुपारी 4.00 (चार) वाजता, यशंवतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड येथे ‘वाग्यज्ञे साहित्य व कला गाैरव पुरस्कार’ प्रदान सोहळा होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका डाॅ. अरुणा ढेऱे आणि अभिनेते मोहन जोशी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रुपये 11 हजार आणि सन्मान चिन्ह असे स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणा-या या पुरस्काराचे स्वरुप आहे. आजवर यापूर्वी ऋदयनाथ मंगेशकर, कवी ग्रेस, यशवंत देव,सुलोचना चव्हाण, श्रीनिवास खळे,डॉ. गिरीश ओक, जगदीश खेबुडकर, सलील कुलकर्णी, सयाजी शिंदे, अच्युत गोडबोले आदी मान्यवरांना हे पुरस्कार दिलेले आहेत.
या संमेलनाचा समारोप शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.00 (सहा) वाजता मान्यवरांच्या कवी संमेलनाने होणार आहे. कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कवी संमेलनात रमण रणदिवे, एेश्र्वर्य पाटेकर, शिवाजी सातपुते, मनोहर आंधळे, देवा झिंजाड, प्रशांत केंदळे, मृणालिनी कानिटकर आणि अस्मिता जोगदंड आदी कवी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे आॅनलाईन प्रेक्षपण करण्यात येणार आहे.
यशंवतराव चव्हाण नाट्यगृहात होणारा संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळा हे दोन्ही कार्यक्रम कोविड 19 च्या शासकीय नियमात होणार आहेत. तर ऑनलाईन प्रक्षेपण होणा-या कार्यक्रमांचा आस्वास घेण्यासाठी रसिकांनी https://www.youtube.com/channel/UCMoh7Q4wMR4mBClBbxQPQ9Q?guided_help_flow=3 या लिंकचा वापर करावा. तसेच
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे You Tube चॅनल या लिंकला सबस्क्राईब करावे. You Tube तसेच Facebook वर साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, वारजे-पुणे आणि Instagram-dilipbaratepune72 यावर फॉलो करावे. रसिकांनी संमेलनातील सर्व कार्यक्रमांचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे अावाहन संमेलनाचे स्वागत अध्यक्ष दिलीप बराटे यांनी यावेळी केले.
