अभिनेते प्रशांत दामले कोरोना पॉझिटिव्ह; मुंबईतील नाटकाचे प्रयोग रद्द
मुंबई – अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वत: फेसबुकच्या माध्यमातून माहिती दिली असून त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्यासोबत काम करणारे सर्व सह कलाकारांची तब्येत उत्तम असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. परंतु, त्यांना मुंबईत होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्या दरम्यान, सर्व शूट बंद करण्यात आले होते. दरम्यान, लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग १२ डिसेंबरला पुण्यात झाला होता. पुण्याचा प्रयोग संपल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांना थोडीशी कणकण जाणवत होती. त्यामुळे त्यानी कोरोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांचं आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.
प्रशांत दामले बुधवारपासून आयसोलेशनमध्ये असल्यामुळे बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहात होणारे प्रयोग रद्द करावे लागणार आहे. प्रशांत दामले यांच्यासोबत काम करणारे सह-कलाकार निरोगी असल्याचंही दामले यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
