Sunday, June 21, 2026
PUNE

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स कडून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला १६ एमएम फुटेज चा दुर्मिळ ठेवा प्राप्त

पुणे – राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर कडून एक दुर्मिळ 16 एमएम फुटेज मिळाले. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या या सुमारे 1200 फूट लांबीच्या फुटेजचा कालावधी 35 मिनिटआहे. यामध्ये एमसीसीआयए. च्या संस्थात्मक इतिहासामधील 1940 ते 1960 च्या काळातील प्रमुख घटनांचा समावेश आहे. प्रामुख्याने ब्लॅक अँड व्हाइट या फुटेजचा काही भाग रंगीत आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर चे महासंचालक श्री. प्रशांत गिरबाने यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम यांच्याकडे आज ही दुर्मिळ रीळ सुपूर्द केली.

१९५९ साली झालेल्या रौप्य महोत्सवी समारंभाची दृश्ये या फुटेजची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्याच बरोबर पुण्याच्या टिळक रोड येथील एमसीसीआयएच्या इमारतीचे उद्घाटन, एमसीसीआयएची मासिक पत्रिका संपदा (जे १९४७ मध्ये सुरू झाले होते), “परिषद आणि चर्चा – सभा” ज्यात शंतनुराव किर्लोस्कर यांचा गौरव समारंभ ही साजरा झाला अशा अनेक महत्वाच्या कार्यक्रमांमधील क्लिप्स आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दिग्गज स्वातंत्र्य सेनानी सी. राजगोपालाचारी हेही एमसीसीआयएमधील एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र आणि पुणे विभाग उत्पादकता परिषद यासारख्या नामांकित संस्थांचे फुटेज ही यामध्ये आहे. एकंदरीत पुण्यातील औद्योगिक विकासाचा आणि त्यासाठी एमसीसीआयएच्या प्रयत्नांचा इतिहास ह्या फुटेजेस मध्ये आहे.

यावेळी प्रशांत गिरबाने म्हणाले , “आम्हाला हे महत्वाचे फुटेज आमच्याच कार्यालयात सापडले आणि आज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला ते जतनासाठी सुपूर्द केले आहे. आम्ही हे महत्त्वपूर्ण फुटेज डिजिटल करण्याचीही विनंती केली आहे.”
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम म्हणाले, “मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर कडून हे दुर्मीळ फुटेज मिळवताना आम्हाला आनंद झाला आहे. हे फूटेज चांगल्या स्थितीत आहे आणि आम्ही त्याचे डिजिटायझेशन करण्यासाठी प्रयत्न करू. पुणे शहराच्या पायाभूत सुविधांची व औद्योगिक विकासाची प्रगती दर्शविणारे हे अतिशय संग्रही मूल्याचे फुटेज आहे.”
मगदूम यांनी एमसीसीआयएला यावेळी विनंती केली की शहरातील जुन्या औद्योगिक संस्थांपर्यंत पोचून अशी दुर्मिळ फुटेज व चित्रपट जतन करण्यासाठी मिळावेत यासाठी मदत करावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading