‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ मधील सनी लिओनी चा मराठमोळा लूक व्हायरल
बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओनी हिचा मराठमोळा लूक सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. यात सनीला मराठमोळ्या वेशात पाहणे हा चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे.
या चित्रपटात नृत्यांगनेच्या रुपात वावरणाऱ्या हेर म्हणजे गनिमाच्या भूमिकेत सनी लिओनी दिसणार आहे. दरम्यान, ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटाचे कथानक 1795 ते 1818 या कालावधीतील असून प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल हा महार योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते आणि गीतकार म्हणून रमेश थेटे जबाबदारी सांभाळत आहेत. ‘सनी या चित्रपटात एका नृत्यांगनेच्या भूमिकेत आहे, मात्र प्रत्यक्षात ती हेरगिरी करत असते’, असे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर ‘भीमा कोरेगावची लढाई ही शोषित आणि समानतेच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजातील उदासीन घटकांची योग्यता, त्याग आणि पराक्रम यांचे प्रतीक आहे’, असे रमेश थेटे म्हणाले. तसेच लढ्याचा इतिहास चांगल्या प्रकारे जाणून त्याद्वारे प्रेक्षकांनी प्रेरित व्हावे यासाठी विषय निवडला, असे त्यांनी सांगितले.
