आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड!
मुंबई, दि. 11 – सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने ड्रेसकोड जाहीर केला आहे. यासाठी सरकारने विशेष जीआरच काढला असून त्यामध्ये कशा प्रकारचा ड्रेसकोड कर्मचाऱ्यांनी घालायला हवा, याविषयी सविस्तर नमूद करण्यात आलं आहे. शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेशभूषा ही सरकारच्या आणि प्रशासनाच्या प्रतिमेला अनुरूप असावी, असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच सरकारी विभागांना सल्ला देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील हा जीआर लागू असणार आहे.
पेहेराव हा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग!
‘शासकीय कर्मचारी हे लोकांशी सरकारचे प्रतिनिधी म्हणून संवाद साधत असतात आणि त्यांचा पेहेराव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र, कार्यालयात काम करणारे आणि विशेषत: कंत्राटी तत्वावर काम करणारे कर्मचारी अनुरूप वेशभूषा ठेवत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते. जर अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी आणि अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावरही होतो. त्यामुळे या मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत’, असं या जीआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
काय आहेत मार्गदर्शक सूचना?
१. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दैनंदिन पेहेराव शासकीय कर्मचाऱ्यास शोभनीय असावा.
२. महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट आणि त्यावर कुर्ता किंवा शर्ट, तसेच आवश्यकता असेल तर दुपट्टा असा पेहेराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पँट/ट्राऊझर पँट असा पेहेराव करावा. गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम-चित्रे असलेले पेहेराव करू नयेत.अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात जीन्स आणि टी-शर्टचा वापर कार्यालयात करू नये.
३. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादीचा पेहेराव करावा.
४. पेहेराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा.
५. कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातलं ओळखपत्र दर्शनी भागात परिधान करावं.
६. कार्यालयात स्लीपर्सचा वापर करू नये.
७. या सर्व सूचना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येणारे कर्मचारी आणि सल्लागार यांना देखील लागू असतील.
