विधायक दृष्टीद्वारे गणेशोत्सव मंडळांचे उत्तम सामाजिक कार्य-इतिहास अभ्यासक मोहन शेटे
पुणे : कोणत्याही ठिकाणी भाषणापेक्षा कृती महत्वाची असते. प्रत्येकाने मोजके शब्द वापरुन आपली कृती प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न करायला हवा. गेली अनेक वर्षे पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते अशाच स्वरुपाचे कार्य करीत आहेत. देवदासींसोबत सलग २१ वर्षे साज-या करण्यात येणा-या भाऊबीजेसारख्या उपक्रमांतून विधायक दृष्टीद्वारे मंडळांचे उत्तम सामाजिक कार्य सुरु आहे, असे मत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी व्यक्त केले.
विधायक पुणे, वंचित विकास आरोग्य केंद्र आणि पुण्यातील गणेशोत्सव मंडळांतर्फे देवदासींसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे बुधवार पेठेत आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, पराग ठाकूर, शिरीष मोहिते, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे श्रीकांत देशपांडे, वंचित विकास संस्थेच्या मिनाक्षी नवले आदी पस्थित होते. कार्यक्रमाला अनेक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी देवदासी महिलांसाठी बांगडया भरण्याचा कार्यक्रम देखील घेण्यात आला.
मोहन शेटे म्हणाले, भारतीय सणांमध्ये अनेक प्रकारचे अर्थ दडलेले आहेत. ते अर्थ उलगडून आपण समजून घ्यायला हवे. आजच्या काळात काही प्रमाणात उपभोगाची वृत्ती वाढली आहे. देण्यात आनंद आहे, ही भावना समाजात निर्माण करता येईल का, याचा विचार आपण करायला हवा. घेण्यापेक्षा देण्याची स्पर्धा वाढायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
आनंद सराफ म्हणाले, सारेच दगड निष्प्राण नसतात, काही कोंडलेले श्वास असतात… घाव घालताना जपून घाला, काही शापित अहिल्या असतात… या उक्तींप्रमाणे देहविक्री करणाºया महिला आपले जीवन जगत असतात. त्यामुळे भाऊबीजेच्या निमित्ताने गणेशोत्सव कार्यकर्त्यांकडून ‘आम्ही भाऊ म्हणून तुमच्या बरोबर आहोत’ अशी ग्वाही देण्याकरीता कार्यक्रमाचे आयोजन केले. समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झालेल्या या महिलांना सण व उत्सव तितक्याच उत्साहाने साजरे करता यावे, यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत.
सेवा मित्र मंडळ, विनायक नवयुग मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, तुळशीबाग मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, पोटसुळ्या मारुती मंडळ आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. तर, सुनील पांडे, नितीन पंडित, उमेश सकपाळ, हनुमंत शिंदे, अजित परांजपे, कुणाल पवार यांनी आयोजनात सहभाग घेतला.
