Good News – ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली; पुढील आठवड्यापासून लसीकरण
लंडन – गेल्या वर्षभरापासून ज्या बातमीसाठी जगातील सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ती वेळ जवळ आली आहे. कोरोनावरील पहिली लस तयार झाली असून ती वितरणासाठीही सज्ज झाली आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. कोरोनावरील लसीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती.
गेल्या डिसेंबर महिन्यापासून कोरोना व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला होता. त्यानंतर हा व्हायरस जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरला. त्यामुळे जगातील सगळ्याची देशाची आरोग्य आणि आर्थिक यंत्रणा खिळखिळी झाली. या संकटातून सावरण्यासाठी कोरोनावर प्रभावी लस येणं गरजेचं होतं. त्यामुळे जगाभरातील असंख्य शास्त्रत्र लस तयार करण्यात गुंतले आहेत. त्यातच, फायझर बायोएनटेकच्या लसीला ग्रीन सिग्नल मिळाला असून ही लस पुढील आवठड्यापासून वितरीत केली जाणार आहे. ब्रिटन सरकारनं फायझर व बायोएनटेकच्या लशीला आज परवानगी दिली. फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना कोरोनावरील लशीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. फायझरची लस कोरोनावर ९५ टक्के प्रभावी असून, जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लशीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.
जगात फायझरच्या लसीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लसीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आलं होतं. पासष्ट वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे. दरम्यान, फायझरची लस साठवण्यात काही अडचणी आहेत. त्यासाठी खूप कमी तापमान लागते.
