Wednesday, June 24, 2026
MAHARASHTRA

राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार; सध्याच्या सवलती कायम

मुंबई, दि. २८ – राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश शुक्रवारी ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. मात्र, आतापर्यंत निर्बंध शिथिल करून देण्यात आलेल्या सवलती कायमच राहणार आहेत.

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्यात टप्प्याटप्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. याबाबत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यातच दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविडबाबतचे नियम पाळण्याचे बंधन मात्र असणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे २०२० या वर्षात लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची आशा आता मावळली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading