आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे निधन
गुवाहाटी – आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचं निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुवाहाटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं होतं. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. २५ ऑक्टोबरला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर २ नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यभरात त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात येत होती. मात्र, अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपले दिवसभराचे सगळे कार्यक्रम रद्द करून ते दिब्रुगडकडे रवाना झाले आहेत.
