करोनाच्या संकटाकाळात पुण्यातील माजी फुटबॉलपटूंनी जपली सामाजिक जबाबदारी!
पुणे, दि. 27 – करोना महामारीच्या संकटकाळी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हिन्सेन्टस् ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) यांनी डेव्हिड ससून अनाथ पंगू गृह (निवारा वृध्दाश्रम) आणि मातोश्री वृध्दाश्रम या संस्थांना धान्य, वाणसामान आणि गृहउपयोगी वस्तुंची मदत करण्यात आली.
व्हिन्सेन्टस् ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) या आजी-माजी फुटबॉलपटूंनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गटाने निवारा आणि मातोश्री वृध्दाश्रम संस्थांमध्ये अन्न-धान्य, दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणार्या गोष्टी, स्वच्छतेचे सामान, संस्थांसाठी निर्जंतुकीकरण सॅनिटायझर डिस्पेन्सर आणि बॉटल्स् आदि गोष्टींची गरज लक्षात घेऊन त्याचे वाटप केली. निवारा वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक श्री. बेलसरे आणि मातोश्री वृध्दाश्रमाचे देखभाल व्यवस्थापक रमेश देवकुळे यांच्याकडे ही वस्तुरूपी मदत सुर्पूत केली.
सेंट व्हिन्सेंट हायस्कूलचे प्रिन्सीपल फादर फ्रान्सीस पाटेकर आणि व्होबाचे अध्यक्ष विक्रम केरींग यांनी या उपक्रमाला पाठींबा दिला. आनंद लोम्बार आणि अमल देव या व्होबा समितीच्या सदस्यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन व नियोजन करून तो पूर्णत्वास नेला. व्होबाचे उपाध्यक्ष नयन सामल, सचिव थानमल सोळंकी, खजिनदार राहूल बनकर, विनोद लोकरे, व्होबा सदस्य अफाक शेख, अमिर मेमन आणि जेसन मार्टीस यांनी या उपक्रमांतर्गत दोन्ही ठिकाणी जाऊन वस्तु हस्तांतरीत केल्या.
गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ कोविड-१९ या महामारीने देशासह शहरामध्ये दहशत निर्माण केली आहे. या कठीण काळामध्ये अशा सेवाभावी संस्थांना दैनंदिन वस्तुंची नितांत आवश्यकता होती. करोनाच्या पाश्वभुमीवर अशा वृध्दाश्रमांनाही खडतर आणि कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. आमच्या व्होबा गटा तर्फे या छोट्याशा मदतीव्दारे या संस्थांना हातभार लावायचा आमचा प्रयत्न असल्याचे व्होबाचे अध्यक्ष विक्रम केरींग व उपाध्यक्ष नयन सामल यांनी सांगितले.
व्होबा गटाने याआधी पुण्यातील लष्कर पोलिस ठाणे, कोथरूड पोलिस ठाणे व सहाय्यक उपायुक्त कोथरूड पोलिस विभाग, भोसरी पोलिस ठाणे, पुलगेट पोलिस चौकी, सोलापुर बाझार पोलिस चौकी, भैरोबानाला पोलिस चौकी, वानवडी परिवहन पोलिस चौकी, औध फायर स्टेशन, नायडु फायर स्टेशन या ठिकाणी पोलिस कर्मचारी, अग्निशामक कर्मचारी आणि हॉस्पिटल कर्मचारी या करोना वॉरीयर्सना या निर्जंतुकीकरण साहीत्यांचे वाटप करून सुरक्षा कवचाची मदत केली होती.
व्होबा या माजी विद्यार्थ्यांच्या गटाने फुटबॉल, बास्केटबॉल आणि जलतरण अशा क्रिडाप्रकारात अनेक स्पर्धांचे आयोजन केले आहे. करोनाच्या संकटप्रसंगी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत या गटातील सदस्यांंनी स्वयंप्रेरणेनी मदत केल्याचे सामल यांनी आवर्जुन सांगितले.
