Monday, June 15, 2026
MAHARASHTRATOP NEWS

तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपत्तीग्रस्तांना दिलासा

सोलापूर, दि. 19 : आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

मुख्यमंत्री  ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.

रमेश बिराजदार हा शेतकरी तब्बल 24 तास झाडावर आणि पाण्यात होता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी त्यांना बाहेर काढले होते. मुख्यमंत्री  ठाकरे यांनी  बिराजदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. उपचार घेतले का, तुम्हाला आता काही त्रास होतोय का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. रडत रडतच त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

आपत्तीग्रस्तांना धनादेशाचे वाटप

यावेळी आपत्तीग्रस्त रमेश बिराजदार, लक्ष्मण कोणदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री  ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले.

ठाकरे यांनी बोरी नदीची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाची त्वरित डागडुजी करण्याचे निर्देश दिले.

तहसीलदार अंजली मरोड यांनी पूरग्रस्त आणि बाधित झालेल्या कुटुंबांची माहिती दिली. रामपूर गावातील 50 टक्के रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी बोरी नदीला पूर आल्याने 40 घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेकडो एकर शेतीचेही नुकसान झाले आहे. बोरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची सात जनावरे वाहून गेल्याने दगावली आहेत. तुरीच्या आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहितीही श्रीमती मरोड यांनी दिली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड, जि.प. सदस्य आनंद तानवडे, सरपंच शोभा बिराजदार, उपसरपंच रोहिणी फुलारी, आदींसह परिसरातील आपत्तीग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading