fbpx
Monday, May 13, 2024
NATIONALTOP NEWS

राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की, प्रियंका गांधींनाही घेतलं ताब्यात!

हथरसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात मृत्यू झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला निघालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवलं. त्यावेळी झालेल्या गोंधळात काही पोलिसांनी थेट राहुल गांधीच्या कॉलरला हात घातला. त्यांना धक्काबुक्की केली. यात राहुल गांधी खाली पडले. यामुळे दिल्लीहून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या डीएनडी उड्डाणपुलावर प्रचंड राडा सुरू झाला. या राड्यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. लाठीमार देखील केल्याची दृश्य समोर आली आहेत. या घटनेचा तीव्र निषेध काँग्रेसच्या देशभरातल्या नेत्यांनी आणि विविध स्तरातल्या राजकीय मंडळींनी केला आहे.

हथरसमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर या प्रकरणावरून मोठा वाद सुरू झाला आहे. सर्व देशभरातून या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेऊन आणि काँग्रेस कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून त्या रोषामध्ये भरच पडली आहे. हथरसच्या घटनेचा निषेध करतानाच थेट हथरसमध्ये जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते निघाले होते. मात्र. त्यांना दिल्ली-नोएडा महामार्गावरच अडवण्यात आलं. बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी जाहीर करण्यात आलेल्या जमावबंदीचं कारण पुढे करून त्यांना अडवण्यात येत होतं. मात्र, त्यानंतरही राहुल गांधींनी ‘मी एकटा जातो. मह जमावबंदीचं उल्लंघन होणार नाही ना?’ असं म्हणून पायीच पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील त्यांना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. यामध्ये राहुल गांधी तोल जाऊन खाली पडले.

या प्रकारानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर तिथून पुढे येण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की, लाठीमार करून पिटाळण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या प्रकारामुळे सध्या उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलीस देखील टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading