गरज पडल्यास राजीव गांधी स्मारक समिती कोरोनाशी लढण्यास महापालिकेच्या मदतीला स्वयंसेवक देणार – गोपाळदादा तिवारी
पुणे, दि ३१ – पुणे शहरात कोरोनाच्या अत्यावस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर-बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. यापार्श्वभूमीवर हॉस्पिटलमधील बेड उपलब्धतेच्या डॅशबोर्ड मधील अडचणींमुळे त्या – त्या ठिकाणी आवश्यकते प्रमाणे स्वयंसेवकांची मदत उपलब्ध करून देण्याची तयारी राजीव गांधी स्मारक कृती समितीच्यावतीने महापालिका प्रशासनाकडे दाखविण्यात आली आहे. गुरुवारी समितीच्या शिष्टमंडळाने पालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांची भेट घेऊन समिती तर्फे झालेल्या “झूम-वेबीनार कोन्फरन्स परिषदेतील माहिती देऊन आवश्यक त्या सहकार्याबाबत चर्चा केली.

राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, माजी आरोग्य प्रमुख डॉ. आर. आर. परदेशी, आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे नेते रवींद्र माळवदकर, डॉ. पी. ए. इनामदार, डॉ. जयश्री तोडकर, आयएमए पुणे अध्यक्षा डॉ आरती निमकर, डॉ राजन संचेती, क्रेडाई महाराष्ट्र लीगल सेलचे आय पी इनामदार, पत्रकार व समिती सदस्य दीपक जाधव इ. सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले, व्हेंटिलेटर असलेले बेड उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. डॅशबोर्ड अपडेट होण्यात अडचणी येत असल्याने संबंधित हॉस्पिटलमध्ये स्वयंसेवक उपलब्ध करून देण्याची तयारी असून, हे स्वयंसेवक तेथे उपस्थित राहून डॅशबोर्ड अपडेट ठेवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना व मनपा प्रशासनास मदत करतील. तिथे किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती ते ठेवतील व आवश्यकते प्रमाणे वितरीत करतील.. या स्वयंसेवकांना महापालिका प्रशासनाने ओळखपत्र इ. द्यावे. तसेच त्यांनी कसे काम करावे याबाबत प्रशिक्षण द्यावे, असे समितीच्या वतीने गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले..!
पुणे शहरात २००८-०९ च्या सुमारास स्वाइन फ्ल्यूची मोठी साथ पसरली होती. त्यावेळी साथ आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडून राबवलेल्या उपाययोजना व उपक्रमांची माहिती माजी आरोग्य प्रमुख डॉ. आर. आर. परदेशी यांनी बैठकीत दिली. महापालिकेचे अनेक डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी फिल्डवर काम करीत आहेत. या सर्वांना सध्या काय मदत हवी, काय उपाययोजना करण्याची आवश्यकता वाटते आहे याची माहिती घ्यावी. त्यानुसार त्यांच्यापर्यंत मदत पोहचवता येईल. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना रिवार्ड द्यावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण बाहेर फिरतांना आढळून आल्यास कठोर कारवाई करावी, असेही डॉ आर आर परदेशी यांनी सांगितले. शहरात ज्येष्ठ नागरिकांचे अनेक संघ, संस्था व हास्य क्लब इ. आहेत. त्यांची मदत घेऊन ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, प्रबोधन करावे. येणाऱ्या काळात साथीचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून पालिकेच्या मोकळ्या इमारती व जागा ताब्यात घ्याव्यात. त्यासाठी बांधकाम विभागाची मदत घ्यावी. शहरातील झोपडपट्ट्या, वस्ती भाग, सोसायट्यांमध्ये जीप, रिक्षांमधून कोरोना बाबत प्रबोधन करावे.. फिरत्या व्हिडिओ व्हेंन, वस्त्यांमध्ये माहिती पत्रके वाटली जावीत व लोकांच्या शंका दूर करण्यासाठी बुथ व मदत – केंद्रे उभारावेत तेथे आवश्यकते प्रमाणे काम करणारे स्वयंसेवक स्वयंसेवी संस्थांकडून घ्यावेत, इ महत्वपूर्ण सूचना डॉ आर आर परदेशी यांनी केल्या..
डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले, कोरोनाची साथ शहरात सुरू झाल्यानंतर खाजगी डॉक्टरांनी संशयित रुग्णांवर उपचार करू नयेत असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. आता त्यांना उपचारात सहभागी करून घेतले आहे. कोरोना रुग्णांची नोंद कशी करावी, त्यांचे होम क्वारंटाईन कसे करावे याबाबत पालिका प्रशासनाने सर्व डॉक्टरांना माहिती द्यावी व तसेच स्वयंसेवकांना प्रशिक्षण देवून घरोघरी पाठवावे.
रवींद्र माळवदकर यांनी प्रत्येक पोलीस चौकी स्तरावर एक बूथ-यंत्रणा उभारण्याची सूचना केली. यामध्ये त्या त्या चौकीच्या हद्दीतील नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, डॉक्टर, गणेश मंडळ व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांना सहभागी करून घ्यावे. या यंत्रणेमार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून कोरोनाला लवकर अटकाव करता येऊ शकेल व मनपाच्या इतर सेवकवर्गाची देखील मदत घ्यावी अशी सूचना हि माळवदकर यांनी केली..
डॉ. जयश्री तोडकर यांनी सांगितले, महापालिकेने कोरोनाला अटकाव करण्यासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग घ्यावा. डॉक्टर असोसिएशन, क्लब, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळ यांना कामे व जबाबदारीचे वाटप करून द्यावे. मनपा ने विविध संस्थांना पुढे येण्याचे आवाहन देखील करावे, असे हि डॉ तोडकर यांनी सांगितले..
डॉ. संजीव वावरे यांनी महापालिकडून बेड वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. नितीन बोलोलीकर यांनी करण्यात आलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

‘राजीव गांधी स्मारक समितीच्या’वतीने शहरातील राजकीय पदाधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी यांची सहाय्यक समिती तयार करण्यात आली असून, कोरोनाच्या वाढत्या साथीला अटकाव करण्यासाठी लोकसहभाग उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे,परंतु पुणे मनपा ने प्रशासना व्यतिरिक्त हि “टीम – बी” म्हणून सर्वसमावेशक “नागरी कृती समिती” ‘मा महापौर व लोकप्रतिनिधी’ यांचे नेतृत्वाखाली नेमल्यास त्यास ‘अधिक व्यापक स्वरूप येईल’ असे गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले.
