या वीकेंडला ‘हे’ 5 चित्रपट बघा online
सध्या देशात असणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे थिएटर बंद आहेत. त्यामुळे बॉलिवूडने चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची निवड केली आहे. त्यामुळे घर बसल्या प्रेक्षकांना फस्ट डे फस्ट शोचा अनुभव घेता येणार आहे. येणारा विकेंड तर चित्रपट प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. कारण ५ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

१. शकुंतला देवी
गुलाबो सीताबो नंतर शकुंतला देवी हा Amazon Prime वर प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट ठरणार आहे. ३१ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहे. हा चित्रपट ‘ह्युमन कॉम्प्युटर’ असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

२. यारा
हा चित्रपट ३० जुलैला प्रदर्शित होणार आहे. ZEE 5 वर ‘यारा’ प्रदर्शित होईल. चित्रपटात विद्युत जामवाल, अमित साध, श्रुती हासन आणि विजय वर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची गोष्ट ही काही मित्रांभोवती फिरते. ज्या मित्रांनी आपलं बालपण एकत्र घालवलं आहे आणि हे मित्र मोठेपणी मात्र गुंड बनतात.

३. अवरोध
शिव अरूर आणि राहुल सिंह यांच्या पुस्तकातील एका गोष्टीवर आधारित ही वेबसिरीज आहे. या वेबसिरीजमध्ये सर्जिकल स्ट्राईकच्या आधीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. ९ भागांच्या या वेबसिरीजमध्ये अमित साद मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय नीरज कबी, दर्शन कुमार, विक्रम गोखले, आनंद महादेवन आणि मधुरिमा तुली यांच्या महत्त्वाच्या भूमिका यात आहेत. ३१ जुलैला ही वेबसिरीज प्रदर्शित करण्यात येईल.

४. लूटकेस
या चित्रपटाची कथा एक पैशाने भरलेल्या बॅगभोवती फिरत असल्याचं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून लक्षात येत आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित हा चित्रपट डिझ्नी हॉटस्टारवर ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात कुणालसोबत रसिका दुगल, रणवीर शौरी, विजय राज हे कलाकार झळकणार आहेत.

५. रात अकेली है
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘रात अकेली है’ असं आहे. हा एक क्राईम मिस्ट्री प्रकारातील चित्रपट आहे. नवाजसोबत राधिका आपटे, स्वानंद किरकिरे, आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धूलिया, पद्मावती राव, शिवानी रघुवंशी असे दर्जेदार कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
