Saturday, June 20, 2026
PUNE

परिचारिकांच्या सन्मानार्थ ८१ वर्षाच्या माजी परिचारिकेने दिली २५ हजार रुपयांची देणगी

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी यांच्या पत्नी आशा जोशी यांचा पुढाकार ; महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनला मदत
पुणे : कोणत्याही आजाराशी लढा देताना रुग्णासोबत प्रत्येक क्षणी असते, ती रुग्णालयातील परिचारिका. डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली काम करणा-या या परिचारिकांचे कार्य डॉक्टरांइतकेच महत्त्वाचे आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात २८ वर्षे निष्ठेने परिचारिका म्हणून सेवा देणा-या ८१ वर्षाच्या माजी परिचारिका आशा जोशी यांनी परिचारिकांच्या सन्मानार्थ २५ हजार रुपयांची देणगी दिली आहे.

सदाशिव पेठेतील स.प.महाविद्यालयाच्या मागील बाजूस राहणा-या ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी यांच्या आशा जोशी या पत्नी. आशा जोशी यांनी वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल डॉ.न.म.जोशी, त्यांच्या मुलगा प्रसाद जोशी व सून वर्षा जोशी यांनी त्यांच्या इच्छेनुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनला ही देणगी दिली आहे. यावेळी असोसिएशनच्या रेखा थिटे, प्रेरणा भद्रे उपस्थित होत्या.
डॉ.न.म.जोशी म्हणाले, माझी पत्नी आशा जोशी हिने ससून रुग्णालयामध्ये २८ वर्षे निष्ठेने परिचारिका म्हणून काम केले. आज ती वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. खरे तर, पारंपरिक पद्धतीने मोठया प्रमाणात हा दिवस साजरा करतात. पण तसे न करता, परिचारिका क्षेत्रात काम करणा-यांना देणगी स्वरुपात मदत देत आम्ही परिचारिकांना सन्मानित करीत आहोत.
आशा जोशी म्हणाल्या, परिचारिकांचे क्षेत्र आजही समाजाकडून दुर्लक्षित आहे. शहरासह खेडयापाडयातील परिचारिकांच्या कल्याणार्थ ही मदत आम्ही देत आहोत. कोरोना महामारीच्या या काळात परिचारिकांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन पैशाच्या स्वरुपात होऊ शकत नाही. परंतु सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून मी माझे कर्तव्य व त्यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करीत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading