राज्यसभा – शरद पवार, राजीव सातव, रामदास आठवले यांच्यासह 44 जणांनी घेतली शपथ
व्यंकय्या नायडू यांनी दिली उदयनराजे भोसलेंना समज
नवी दिल्ली, दि. 22 – राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 44 खासदारांनी यावेळी खासदारकीची शपथ घेतली. शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि काँग्रेसचे राजीव सातव यांनी मातृभाषा मराठीतून शपथ घेतली.

राज्यसभेवर निवडून गेलेल्या 61 सदस्यांना खासदारकीची शपथ घ्यायची आहे, मात्र आज 44 सदस्यांचा शपथविधी झाला. उर्वरित खासदारांचा शपथविधी पुढील अधिवेशनात पार पडेल. दरम्यान, आज सकाळी 11 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचे संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुनच हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यसभेवर नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित खासदारांमध्ये भाजपचे 17, काँग्रेसचे 9, जदयूचे 3, बीजद आणि वायआरएस काँग्रेसचे प्रत्येकी 4, अन्नाद्रमुक आणि द्रमुकचे प्रत्येकी 3, एनसीपी, आरजेडी आणि टीआरएसचे प्रत्येकी 2, शिवसेनेच्या 1 आणि अन्य खासदारांचा समावेश आहे. नवनिर्वाचित 61 खासदारांपैकी 43 खासदार पहिल्यांदाच राज्यसभेवर गेले आहेत.
महाराष्ट्रमधून भाजपचे उदयनराजे भोसले, भगवत किसनराव कराड, काँग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, राष्ट्रवादीचे शरद पवार, फौजिया खान आणि रिपाईच्या रामदास आठवले यांनी खासदारकीची शपथ घेतली.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी आपली शपथ इंग्रजी भाषेतून घेतली. शपथेबरोबर उदयनराजे यांनी ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी- जय शिवाजी’, असा घोषणा दिल्या. शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.
