‘जय गणेश व्यासपीठांतर्गत’ मध्य पुण्यातील २७२ गणेशोत्सव मंडळांतर्फे ‘कोरोना मुक्तीसाठी आरोग्योत्सवाला’ प्रारंभ
पुणे, दि. २१- सध्या कोरोनाची साथ पुणे शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच कोरोना विरुद्धच्या प्रभावी लढ्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळे सक्रीय सहभाग घेत आहेत. जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून मध्य पुण्यातील २७२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्योत्सवाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरुन कामाला प्रारंभ केला. पुणेकरांचे सहकार्य मिळविण्यासाठी तसेच पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग व होम आयसोलेशनसाठी पुणे मनपा प्रशासनाला सहाय्य करण्याकरीता मंडळांनी पुढाकार घेतला आहे.

कशी असेल कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्यक्ष कार्यपद्धती?
गणेश मंडळ म्हणून आपल्या भागाची जबाबदारी मंडळ व कार्यकर्त्यांवर येते. ज्या रुग्णाला लागण झाली त्या घरातील लोक व त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना बाजीराव रस्त्यावरील सणस ग्राउंड येथे मोफत तपासणीसाठी पाठविण्यात येईल. कार्यकर्त्यांसोबत महानगरपालिकेची टिम देखील असणार आहे. फक्त कार्यकर्त्यांच्या संबंधामुळे विश्वासाहर्तेमुळे नागरिक सहकार्य करतील व स्वत:ची तपासणी करून घेतील. त्यामुळे आपल्या भागात लागण जास्त होणार नाही व नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे. याद्वारे ही साखळी कमी होण्यास मदत होईल.
