नेपाळकडून पुन्हा गोळीबार; एक भारतीय तरुण गंभीर जखमी
पाटणा, दि. 20 – नेपाळच्या सशस्त्र पोलिसांनी बिहारच्या सीमेवर भारतीय नागरिकांवर अधूनमधून गोळीबार सुरूच ठेवला आहे. बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवरील माफी टोला गावातील तीन भारतीय नागरिकांवर नेपाळी पोलिसांनी शनिवारी रात्री गोळीबार केला. या गोळीबारात जितेन्द्र कुमार सिंह हा तरुण जखमी झाला आहे. हा तरुण खानियाबाद पंचायतीच्या माफी टोला गावचा रहिवासी आहे.

जितेन्द्र कुमार सिंह याला माफी टोला येथून स्थानिक ग्रामस्थांनी टेठागाछ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तिथे त्याच्यावर तातडीचे उपचार करून त्याला अधिक चांगल्या उपचारासाठी पूर्णिया जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जितेन्द्र कुमार सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पूर्णिया येथील रुग्णालयातून सांगण्यात आले आहे.
यापूर्वी 12 जून रोजी लालबंडी-जानकी नगर सीमेवरील सोनबरसा येथे शेतात काम करणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांवर नेपाळी पोलिसांनी असाच अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात विकेश कुमार राय हा पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला होता. नेपाळ आणि भारत यांची सीमा 1,850 किलोमीटर लांबीची असून बिहारमध्ये यापैकी 900 किलोमीटरचा सीमा भाग आहे.
