fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला पुरंदर तालुक्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा

पुणे, दि. 14 : पुरंदर तालुक्यासह आजूबाजूच्या सर्व भागात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी अधिक दक्ष राहून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करणे, उपद्रव करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे, प्रसंगी काही लोकांना संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) कक्षात पाठविणे अशी कारवाई आपल्या स्तरावरून करावी. जेणेकरून आपले गाव व पर्यायाने आपला तालुका कोरोना विषाणूपासून लवकरच मुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज व्यक्त केला. तसेच पुरंदर तालुक्यात कोविड केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढविण्यासोबतच कोरोनाबधित रुग्णांच्या अधिकाधिक संपर्क शोधण्यावर भर द्या अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

सासवड तहसील कार्यालयात पुरंदर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पंचायत समितीच्या सभापती नलीनी लोळे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, जेजुरीचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने, सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळत, जेजुरीचे मुख्याधिकारी पूनम शिंदे, निवासी नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे, नायब तहसीलदार उत्तम बडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सासवड , जेजूरी शहरासोबतच ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी तसेच संस्थात्मक विलगीकरण, कोरोना चाचणी व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेसाठी स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठया प्रमाणात सहकार्य मिळत आहे. गावपातळीवर बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना तसेच कोरोना बाधित व्यक्तिंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. तसेच होम आयसोलेशनबाबत काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटंबाला माहिती देण्यासोबतच कोरोनाबाबत दक्षता घ्या, घाबरू नका, असा सल्ला देण्याचेही त्यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची वाढ करण्यावर भर देणार असल्याचे सांगतानाच कोरोना संसर्गाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी गावनिहाय नियोजन करून जनजागृतीसाठी ध्वनीफित असणारे फिरते वाहन गावात पाठवा तसेच मास्क न वापरणे, लग्नसमारंभात नियमापेक्षा अधीक संख्या तसेच अनावश्यक गर्दी करणा-यांवर कडक कारवाई करा, या कारवाईसाठी भरारी पथक तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर, कोविड आरोग्य तपासणी केंद्र वाढवावेत तसेच कन्टेंन्मेंट झोनमधील नागरिकांची प्राधान्याने आरोग्य तपासणी करावी. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तिंचा अत्यंत काटेकोरपणे शोध घेणे आवश्यक आहे. तसेच संस्थात्मक विलगीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अत्यावश्यक सेवा व इतर महत्वाच्या कामाशिवाय अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक वॉर्डनिहाय कोरोना संसर्ग रोखण्याच्या मदतीसाठी पाच स्वंयसेवकांची नेमणूक करणार असून सर्व नियमांचे पालन केले तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश येईल, असे त्यांनी सांगितले.
तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी पुरंदर तालुका प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading