‘राजगृह’ हल्ला प्रकरणात प्रकरणी एकाला अटक; मुख्य आरोपी अद्याप मोकाट
मुंबई, दि. ९ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुरुवारी एकाला अटक केली. उमेश सीताराम जाधव (३५) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता. मुख्य आरोपी अद्याप मोकाट असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची, कुंड्यांची मंगळवारी नासधूस करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत राजगृहाच्या काचांचे नुकसान झाले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. राजगृहाजवळ कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते मात्र त्याचा सहभाग आढळला नाही.
सीसीटीव्ही फुटेजची झाडाझडती सुरू असताना मुख्य आरोपी दगडफेक करत असताना दुसरा तरुण राजगृहाच्या परिसरात कुणी येत आहे का? यावर नजर ठेवत असल्याचे दिसले. या फुटेजच्या आधारे माटुंगा पोलिसांनी परेल टीटी येथे बिगारी काम करणाऱ्या उमेश जाधव याला शोधून काढले. उमेश याची कसून चौकशी करण्यात येत असून त्याने दिलेल्या माहीतीवरून मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही दगडफेक का करण्यात आली, यामागचे कारण मात्र समजू शकले नाही.
