fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

कोरोना व पावसाळ्यातील आजारांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे – मुख्यमंत्री

मुंबई, दि. ४: मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी आणि कोरोना प्रतिबंध यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, वॉर्ड अधिकारी आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनासंदर्भात राज्यात जे काम सुरू आहे त्याबद्दल केंद्रीय पथकाने कौतुक केले आहे. मुंबईत यंत्रणा अहोरात्र मेहनत करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र लढाई अजून संपलेली नाही. कोरोनाचे रुग्ण अजुनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे, ते कमी झाले पाहिजे.

कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांना स्टेरॉईड दिले जाते. त्याबाबत सर्व कोरोना रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात आणि त्यानुसारच उपचारात त्याचा वापर केला जावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहे. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या कोरोना उपचार केंद्रांवर वाढणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. ट्रॅकींग आणि टेस्टींग वाढविण्यात यावे आणि संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा देखील वाढवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत ज्या ठिकाणी अर्धवट बांधकामे होऊन इमारती ओस पडलेल्या आहेत अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती केंद्रे होऊ नये याकरिता फवारणीचे काम हाती घ्यावे. भूमिगत कामांच्या ठिकाणी देखील पाणीसाठा होऊन डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ शकतात ते वेळीच नष्ट करा, असे त्यांनी सांगितले.

महापालिकेने एमएमआरडीए, रेल्वे, बीपीटी, मेट्रो, एअरपोर्ट ॲथोरिटी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या सर्व संबंधित यंत्रणांची समन्वय बैठक आयोजित करून सर्व कामांना गती द्यावी. रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी सर्व संबंधित यंत्रणांचे एकत्रित पथक स्थापन करण्यात यावे. रस्ता कुणाच्याही ताब्यातील असो, त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम केले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

गणेशोत्सव काळात आरोग्य तपासणी, रक्तदान, प्लाझ्मादानासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यासाठी नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी मंत्री ॲड. परब म्हणाले की, मुंबईत पावसामुळे तुंबणारे पाणी, रस्त्यांवर पडणारे खड्डे आदी बाबत मुंबई महापालिकेसह मुंबईत अन्य ज्या विविध यंत्रणा आहेत त्यामध्ये समन्वय ठेवण्यात यावा. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, श्री. चहल, श्री. मेहता यांनी विविध मुद्दे मांडले. पावसाळा आणि कोरोना यासंबंधात करण्यात येत असेलेल्या उपाययोजनांची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading