Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली – गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गार

पोलीस कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियास सानुग्रह अनुदानाचे धनादेश प्रदान

सोलापूर, दि. २७ : कोरोनाच्या विषाणू प्रसाराच्या काळात आघाडीवर राहून काम करून राज्यभरात पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्याचे मोठे काम केले, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज काढले.

सोलापूर येथे कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कोरोना योद्ध्यांच्या परिवाराला शासनातर्फे सानुग्रह अनुदानाचे धनादेश आज प्रदान करण्यात आले, त्यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख बोलत होते. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री संजय शिंदे, यशवंत माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मृत झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते.

कोरोनाविरूद्ध जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरीने पोलीस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर लढत आहेत. ही अभिमानाची बाब असून तीन महिन्यातील काम सर्वात उत्कृष्ट आहे. राज्यभरात कोरोनाने ५८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाची मदत मिळावी म्हणून ५० लाखांचे सानुग्रह अनुदान, १० लाख पोलीस महासंचालक सहायता निधी आणि ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्या बँकेकडून काही रक्कम असे ६५ लाख रुपये देण्याचे नियोजन केले. जे कर्मचारी मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबियांना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपर्यंत शासकीय निवासस्थानात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाची लागण झाल्यास पोलिसांना सर्व सोयीसुविधा असणाऱ्या दवाखान्यात उपचारांची सोय करण्यात आली आहे, पोलीस परिवारांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी कोविड-19 बाधित होऊन मृत झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक ताजोद्दीन शेख (एमआयडीसी पोलीस ठाणे) यांच्या पत्नी श्रीमती सगीरा शेख यांना ५० लाखांचा धनादेश गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. यापूर्वी त्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाचा १०लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.

पोलीस नाईक महादेव राठोड यांच्या पत्नी श्रीमती जयश्री राठोड यांना ५० लाख आणि १० लाख असे ६० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.

पोलीस नाईक झाकीर शेख (शहर वाहतूक शाखा), सोलापूर ग्रामीणचे रामेश्वर परचंडे आणि शिंपी सिद्रामप्पा अंबलगी यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून त्यांनाही लवकरच सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading