कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात!
मुंबई, दि. १३: राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले.

कोरोना चाचण्यांच्या दरासंदर्भात अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत केली होती, या समितीने शासनाला अहवाल सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
समितीने निर्धारित वेळेत अहवाल दिल्याने सामान्यांना दिलासा
२ जून रोजी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती गठीत केली होती. त्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. या समितीला आठवडाभराचा कालावधी देण्यात आला होता. निर्धारित केलेल्या कालावधीत समितीने आपला अहवाल सादर करून सामान्यांना दिलासा दिल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
कोरोना चाचण्यांसाठी सर्वात कमी दर महाराष्ट्रात
याबाबत अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी ४५०० रुपये आकारत होते. घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे ५२०० रुपये आकारले जात होते. मात्र समितीने केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षावरून आता राज्यात कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपये आकारले जातील तर घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी २८०० रुपये आकारले जातील. संपूर्ण देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या दर निश्चितीमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या
देशात महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या केल्या जात आहेत, सध्या राज्यात ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्याचे सांगून राज्यात आयसीएमआरच्या मार्गदर्शिक सूचनांनुसारच चाचण्या होत असून त्यात कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on LinkedIn (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to email a link to a friend (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)