Tuesday, June 23, 2026
MAHARASHTRA

कोरोना – महाराष्ट्रात 1 लाखांहून अधिक रुग्ण, दिवसभरात 3493 रुणांची भर, तर 127 मृत्यू

शुक्रवारी 1718 रुग्ण बरे होऊन घरी, एकूण 47 हजार 796 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई, दि. 12 – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी 3493 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 141 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाबमध्ये आज एकूण 1718 रुग्ण बरे होऊन घरी आहेत, तर आजपर्यंत एकूण 47 हजार 796 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात एकूण 127 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या 49 हजार 616 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज झालेल्या 127 मृत्यूंपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत आज 90, ठाण्यात 11, पुण्यात 12, कल्याण-डोंबिवलीत 3, वसई-विरार, मीरा-भाईंदर, धुळे आणि अमरावतीत प्रत्येकी एक, नाशिक आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी दोन, सांगलीत 3 रुग्ण दगावले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 92 पुरुष आणि 35 महिलांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी 67 रुग्ण 60 वर्षांवरील, 52 रुग्ण हे 40 ते 59 वयोगटातील आणि 8 रुग्ण 40 वर्षाखालील आहेत. तर 89 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासह इतर आजार होते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 141 वर पोहोचली तरी आतापर्यंत एकूण 47 हजार 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट 47.3 टक्के एवढा आहे. तर राज्यातील मृत्यूदर 3.7 इतका आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading