fbpx

ढोल-ताशा वादकांनी जाणून घेतल्या बँड वादकांच्या व्यथा  

पुणे, दि. 9 – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नसराई गेली आणि पुढे काय?, हा प्रश्न आम्हा बँड वादक व चालकांसमोर उभा राहिला. काहीसा दुर्लक्षित होत असलेला बँड, त्यातील कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यात दिलासादायक बाब म्हणजे गणेशोत्सवात पुण्यासह महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे ढोल-ताशा वादक आमच्या व्यथा समजून घेत आमच्या मागे उभे राहिले आहेत. वादकांच्या मागे वादक उभा राहणे ही पहिलीच घटना आहे, असे मत प्रख्यात बँड वादक व प्रभात बँडचे अमोद सोलापूरकर यांनी व्यक्त केले.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे कोरोनाने झालेल्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या बँड चालक व कलाकारांची व्यथा जाणून घेण्याकरीता फेसबुकद्वारे आॅनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजाभाऊ कदम, बँड प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन ववले, ओंकार आढाव, बाळासाहेब आढाव, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, संघटक अनुप साठये, सचिव संजय सातपुते, शिरीष थिटे, विलास शिगवण, केतन देशपांडे, अतुल बेहरे, प्रकाश राऊत, ओंकार कळढोणकर, आशुतोष देशपांडे आदी सहभागी झाले होते.

ढोल-ताशा वादक तुमच्यासोबत आहेत, हा विश्वास बँड वादकांना देणे हा या कार्यक्रमामागील उद््देश होता. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत दिलेल्या पथक प्रमुखांचा सन्मान व पुणे बँड कला विकास प्रतिष्ठान अंतर्गत असलेल्या २२५ बँड वादकांना धान्याची कृतज्ञता भेट देखील देण्यात आली. देवदासी भगिनींना १०० किलो तांदूळ देण्यात आला.

आनंद सराफ म्हणाले, ढोल-ताशा पथके वादनातून संस्कृतीचा जागर करतात. त्यासोबतच पथकांकडून खूप मोठया प्रमाणात सामाजिक व चांगले उपक्रम होतात. ते उपक्रम समाजासमोर यायला हवे. केवळ ढोल-ताशा वादनामुळे होणारा त्रास समोर येतो. मात्र, त्यांनी केलेले समाजोपयोगी उपक्रम येत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पराग ठाकूर म्हणाले, ढोल-ताशा पथकातील वादकांचे जीवन वादनावर अबलंबून नसते. मात्र, बँड वादकांचे जीवन त्यावर अवलंबून असते. नगारा, वाजंत्री आणि बँड वादकांसमोर लॉकडाऊनमुळे समस्यांचा डोंगर उभा राहिला. प्रत्यक्षात पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ही मंडळी आहेत. त्यामुळे आम्ही ढोल-ताशा वादक म्हणून त्यांच्या मागे उभे आहोत, असेही ते म्हणाले. महासंघाचे सचिव संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: