Friday, August 28, 2026
Latest NewsNATIONALPUNE

केतन अग्रवाल प्रकरणानंतर विवाहपूर्व तपासणीची गरज अधोरेखित; अनेक कुटुंबे फसवणूक आणि संकटांपासून वाचू शकतात : डिटेक्टिव्ह प्रिया काकडे

  • विवाहपूर्व पार्श्वभूमी पडताळणी ही आता पर्याय नव्हे तर काळाची गरज!

पुणे  : पुण्यासह देशभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणानंतर विवाहपूर्व पार्श्वभूमी पडताळणी (Pre-Matrimonial Investigation) आणि भावी जोडीदाराची सत्य माहिती जाणून घेण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, असे प्रतिपादन स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशनच्या संचालिका डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी केले. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विवाहपूर्व तपासणी, विवाहबाह्य संबंध, वैवाहिक फसवणूक, आर्थिक गुन्हे, घटस्फोट आणि कौटुंबिक वाद यासंदर्भातील अनुभव त्यांनी यावेळी मांडले.

प्रिया काकडे म्हणाल्या की, लग्न हा व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. मात्र आजही अनेक कुटुंबे केवळ आर्थिक स्थिती, सामाजिक प्रतिष्ठा, शिक्षण किंवा बाह्य आकर्षण पाहून विवाह ठरवतात. भावी वधू किंवा वराचे पूर्वीचे संबंध, घटस्फोट, आर्थिक व्यवहार, गुन्हेगारी पार्श्वभूमी, मानसिक स्थिती किंवा इतर महत्त्वाच्या बाबींची पडताळणी केली जात नाही. त्यातून पुढे गंभीर कौटुंबिक व कायदेशीर समस्या निर्माण होतात.

अलीकडील केतन अग्रवाल आणि राजा रघुवंशी यांसारख्या चर्चित घटनांनी समाजासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत. विवाहबाह्य संबंध, फसवणूक, जबरदस्तीने लावलेली लग्ने, खोटी माहिती देऊन जुळवलेले विवाह आणि आर्थिक स्वार्थातून निर्माण होणारे वाद यांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

“अनेक वेळा मुलगा किंवा मुलगी लग्नाबाबत इच्छुक नसतानाही सामाजिक दबावामुळे विवाह केला जातो. काही प्रकरणांमध्ये पूर्वीचे प्रेमसंबंध सुरूच असतात. त्याची माहिती लपवली जाते. परिणामी लग्नानंतर काही महिन्यांतच वाद, मानसिक छळ, घटस्फोट किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडतात. योग्य वेळी पार्श्वभूमी पडताळणी केल्यास अशा अनेक घटना टाळता येऊ शकतात,” असे काकडे यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, प्री-मॅट्रिमोनियल तपासणीमध्ये व्यक्तीची वैवाहिक स्थिती, पूर्वीचे विवाह किंवा घटस्फोट, आर्थिक व्यवहार, मालमत्ता, गुन्हेगारी नोंदी, सामाजिक वर्तणूक, व्यसनाधीनता, चालू संबंध आणि इतर महत्त्वाच्या बाबींची पडताळणी केली जाऊ शकते.

लग्नाच्या प्रक्रियेदरम्यान सतत टाळाटाळ करणे, संवाद टाळणे, वारंवार खोटी कारणे सांगणे, कुटुंबाशी संपर्क टाळणे किंवा लग्नाबाबत अनास्था दाखवणे हे महत्त्वाचे “रेड फ्लॅग्स” असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशनने २००६ पासून आजपर्यंत विवाहपूर्व पडताळणी, विवाहबाह्य संबंध, आर्थिक फसवणूक, कौटुंबिक वाद, बेपत्ता व्यक्तींचा शोध, मॅट्रिमोनियल फ्रॉड आणि कॉर्पोरेट तपास अशा 2,048 हून अधिक प्रकरणांचा यशस्वी तपास केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

“आमचा उद्देश केवळ कोणावर संशय घेणे नाही, तर वस्तुस्थिती समोर आणणे आहे. विवाहपूर्व योग्य माहिती मिळाल्यास अनेक कुटुंबांचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान टाळता येते. सत्य माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय हा नेहमीच सुरक्षित निर्णय ठरतो,” असेही काकडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी विवाहसंस्था, सोशल मीडियामुळे वाढणारे विवाहबाह्य संबंध, मॅट्रिमोनियल वेबसाइट्सवरील फसवणूक आणि न्यायालयीन कामकाजासाठी पुरावे संकलन यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर काकडे यांनी सविस्तर उत्तरे दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading