वसंत मोरे पुन्हा ऍक्टिव्ह शहर अध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच मनसे कार्यालयात
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यात मनसे सदस्य नोंदणीला सुरूवात झाली यावेळी वसंत मोरे उपस्थित होते. दरम्यान, शहराध्यक्ष पदावरून तडका फडकी हटवल्यानंतर वसंत मोरे काही काळ पक्षाबद्दल नाराज असल्याचं त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे जोपर्यंत राज ठाकरे सांगणार नाहीत तोपर्यंत पक्ष कार्यालयात जाणार नाही अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती. मात्र आता राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर वसंत मोरे ऍक्टिव्ह झाले असून ते पहिल्यांदा मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात हजर राहिले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये त्यांनी मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नाला हात घातला होता. त्यानंतर राज्यभर वातावरण पेटलं होतं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद देशभर पसरल्यानंतर पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी आपल्या प्रभागातील मशिदीवरील भोंगे हटवण्यास विरोध केला होता. त्यानंतर त्यांना पक्षाकडून मनसे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं होतं. साईनाथ बाबर यांना मनसे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याचं बोललं जात होतं.
वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नवीन जबाबदारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या वसंत मोरे यांना थेट सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांना नवी जबाबदारी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्याचे दिसून येत आहे.
