अफजल खानाच्या वध देखाव्याला अखेर पोलिसांची परवानगी
पुणे:पुण्यातील कोथरूड परिसरातील एका गणेश मंडळाला अफजल खान वध हा ऐतिहासिक जिवंत देखाव्यासाठी परवानगी नाकारली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असं कारण देत हा देखावा साकारण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे पुण्यातील गणेश मंडळे आक्रमक झाली होती. विधानसभेचे या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते.
आज सकाळी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी कोथरूड पोलीस स्टेशनला भेट देऊन अफजल खान वधाचा ऐतिहासिक जिवंत देखाव्यासाठी परवानगी द्यावी यासाठी तक्रार दाखल केली होती. त्यावर आज कोथरूड पोलिसांनी अफजल खानाचा वध हा देखावा सादर करण्यास कोथरुड पोलीस ठाण्याकडून अखेर परवानगी देण्यात आली आहे. कोथरूड पोलिसांकडून संगम तरुण मंडळाला ही परवानगी दिली आहे. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईमध्ये दहिहंडीच्या उत्सवात गोविंदांनी अफझल खानाचा वध हा देखावा सादर केला होता. मात्र, पुण्यात या देखाव्याला परवानगी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता गणेशोत्सवाचा अनुषंगाने दिलेल्या परवानगीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन पोलिसांकडून मंडळाला करण्यात आले आहे. दरम्यान हा देखावा साकारण्याची परवानगी मिळाल्याने गणेश मंडळाकडून होणारे आंदोलन रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांनी दिली आहे.
