Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेची कास धरावी- निशी बाला

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा पिढीने एकमेकांना मदत आणि मार्गदर्शन करत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या उपविभागीय संचालिका निशी बाला यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘यशोत्सव’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कुशल मनुष्यबळाचे जागतिक केंद्र बनण्याच्या प्रवासात ‘यशस्वी’ सारख्या संस्थांचे योगदान उल्लेखनीय आहे,असेही त्या यावेळी म्हणाल्या. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीने देखील भविष्यात जगभरातील उद्योग जगताची मागणी असलेल्या कुशल मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी आणि देशातील युवा पिढीला कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून करिअरच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ते सहकार्य आणि आवश्यक ते प्रयत्न निश्चित केले जातील, असा विश्वास निशी बाला यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी त्यांच्या हस्ते ‘यशोगाथा’ या विशेष अंकाचं प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन व प्रशासन विभागाचे प्रमुख संदीप बिडकर आणि नाट्यदिग्दर्शक रवींद्र देवधर यांचीही उपस्थिती होती.

यशस्वी संस्थेच्या माध्यमातून ऑन द जॉब ट्रेनिंग पूर्ण करून नामांकित कंपन्यांद्वारे ऑनरोल नोकरीची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य आणि एकपात्री अभिनय असे विविध कलाप्रकार यावेळी सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्राची राऊत, ईशा फाटक, मीनाक्षी हिरेमठ, रेखा कापसे हिना खान, स्वाती घाडगे, गणेश साळवे, ज्ञानेश्वर गोफण, शाम वायचळ, पृथ्वी माईणकर आदींनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading