महानगरपालिकेच्या निवडणुका वेळेत घ्याव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी न्यायालयात
पुणे : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. न्यायलयाच्या आदेशानंतरही शिंदे-फडणवीस सरकारने महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. निवडणुका वेळेत घ्याव्यात अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
प्रशांत जगताप यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या निवडणुका या वेळेत घ्याव्यात या मागणीसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेच्यावतीने आम्ही काल राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल केली आहे. आज आणखी एक याचिका आम्ही न्यायालयात दाखल करणार आहोत. मागच्या पाच महिन्यांपासून पुणे मनपासहित राज्यातल्या १४ महापालिका, २७ जिल्हापरिषदा, ३५० पंचायत समित्या आणि ३५० नगरपालिकेत प्रशासक नेमण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ओबीसी आरक्षणाच्या निकालावेळी १५ दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन करत या निवडणुका आणखी सात महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्वोच न्यायालयाचा अवमान आहे, त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने नागरिकांना याचा त्रास होतो आहे. अनेकांना पाणी, स्वच्छता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असेही प्रशांत जगताप म्हणाले.
