‘वॉशिंग मशीन आंदोलना’द्वारे राष्ट्रवादीची नव्या मंत्र्यांविरोधात आक्रमक भूमिका
पुणे : काल शिंदे – फडणवीस सरकारच्या १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यातील अब्दुल सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचे व संजय राठोड यांच्यावर बलात्काराचे आरोप असतानाही मंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे. या भ्रष्ट नेत्यांविरोधात आज पुण्यात ‘वॉशिंग मशीन आंदोलन’ करण्यात आले.
या आंदोलनात वॉशिंग मशीन ने अनेक प्रकरणात सापडलेल्या मंत्र्यांच्या फोटोंना आंघोळ घालण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केले. या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्ष सीमा सातपुते यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीप देशमुख म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना आमचे नवाब मलिक, अनिल देशमुख वेगवेगळ्या प्रकरणात अडकले होते. तेव्हा या भाजप ने वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. शिंदे व फडणवीस सरकार
सत्तेत आल्यावर काल वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेल्या आमदारांना मंत्रीपद देण्यात आले. हे चुकीचे आहे. त्यांना काल मंत्रीपदाची शपथ नव्हती द्यायला पाहिजे. म्हणून आज आम्ही राज्य सरकारच्या नव्याने स्थापित केलेल्या मंत्री मंडळात समाविष्ट केलेल्या क्लीन मंत्र्याची वाशिंग मशीन मध्येआंघोळ घालून आम्ही निषेध करत आहोत, असे प्रदीप देशमुख म्हणाले.
